इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नागालँड विधानसभेच्या निवडणुकीत इतिहास रचला गेला आहे. राज्यात प्रथमच विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. दिमापूर विधानसभेतून हेकाणी जाखलू या विजयी झाल्या आहेत. हेकाणी यांनी भाजप आणि एनडीपीपी युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी एलजेपी (रामविलास) च्या अजितो जिमोमी यांचा १५३६ मतांनी पराभव केला.
अर्धा डझन आलिशान कार
राज्यात विधानसभा निवडणुकीत केवळ चार महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. हेकाणी त्यापैकीच एक आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हेही मुख्यमंत्री नेफियु रियो यांच्यासोबत निवडणुकीदरम्यान हेकानी यांच्या प्रचारासाठी पोहोचले होते. ४८ वर्षीय एनडीपीपी नेते हेकाणी यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी २०१३ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सॅन फ्रान्सिस्को स्कूल ऑफ लॉमधून मास्टर्स ऑफ लॉ मिळवले. हेकाणी यांच्याकडे ५.५८ कोटींची संपत्ती आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःवर ४१.९५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचेही जाहीर केले आहे. हेकाणी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार हेकाणी आणि त्यांच्या पतीकडे अर्धा डझन गाड्या आहेत. त्याची एकूण किंमत १.३२ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. हेकाणी यांच्याकडे टोयोटा इनोव्हा कार आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी पतीच्या नावे पाच वेगवेगळ्या कारची यादी सादर केली आहे.
घड्याळ आणि घर
हेकाणी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, हेकाणी ३० हजार रुपयांचे दागिने आणि २ लाख रुपयांचे घड्याळ घालतात. तसेच पतीकडे ६० हजार किमतीची सोन्याची अंगठी व २ लाख रुपये किंमतीची सोनसाखळी आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता ३.५१ कोटींहून अधिक आहे.
हेकाणी यांच्या स्वत:च्या नावावर कोणतेही घर नाही. त्यांच्याकडे २२.५० लाख आणि १५ लाख रुपयांच्या दोन शेतजमिनी असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे. याशिवाय पतीच्या नावावर व्यावसायिक व निवासी इमारत आहे.
Nagaland Historic Election Women Elected as a MLA