कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा प्रयोग कशा पद्धतीने राज्य स्तरावरील पहिलाच प्रयोग ठरला याची ही यशोगाथा..
कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग अर्थात शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यामधे पूर्वापार खरीप हंगामात नाचणीचे पीक घेतले जाते. पुर्वीच्या काळी नाचणी पिकवणा-या प्रत्येकाच्या (शेतकऱ्याच्या) रोजच्या आहारात तिचा आवर्जून उपयोग व्हायचा. पण ‘गव्हाची चपाती आणि पांढरी भाकरी खाणारा म्हणजे श्रीमंत वर्ग आणि नाचणीची तांबडी भाकरी खाणारा गरीब वर्ग’ अशी समजूत रुढ होत गेल्याने हळुहळु नाचणी पिकवणा-यांच्याच ताटातून नाचणी हद्दपार होत गेली.
एकेकाळी भोजनाचा महत्वाचा भाग म्हणून सन्मान लाभलेली नाचणी बाजारात मागणी नसल्याने आणि अतिशय कमी दर मिळत असल्याने शेतकरी बांधवांनीही नाकारली.
दिवाळीनंतर काही व्यापारी कोल्हापूर मधल्या या नाचणी उत्पादक भागात ट्रक, टेम्पोमधून निकृष्ट दर्जाचा गहू, ज्वारी घेऊन यायचे. या गव्हाच्या आणि ज्वारीच्या बदल्यात दुप्पट, तिप्पट नाचणी घेऊन जायचे. नाचणीचे आहारातील महत्व माहीत नसल्याने उत्पादक शेतकरीही हा व्यवहार आनंदाने करायचे. मात्र जेव्हा नाचणी उत्पादक चपाती किंवा भाकरीच्या प्रेमात पडला होता तेव्हा शहरांमधील उच्चवर्गीय वर्ग जो स्वतःच्या आरोग्याबाबत जागरुक आहे त्याने मात्र चपातीला ताटातून बाहेर करुन नाचणी, बाजरीच्या भाकरीला सन्मानपूर्वक ताटात घेतले होते.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात नाचणी पीक खरीपात घेतले जाते. नाचणीचा स्वतःच्या घरातच उपयोग कमी कमी होत गेल्याने आणि व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी किंमतीत खरेदी होत असल्याने नाचणी पीक उत्पादन वाढीसाठी शेतकरी फार प्रयोग करताना दिसत नाहीत. वापर नसल्याने मागणी कमी, मागणी नसल्याने लागवड कमी आणि लागवडच कमी असल्याने संशोधनही कमी आणि संशोधन कमी त्यामुळे उत्पादनही कमी या विचित्र चक्रात गेली कित्येक वर्षे नाचणीचे पीक अडकले होते.
निदान नाचणी उत्पादक शेतकरी कुटुंबाला नाचणीचे महत्त्व समजावे आणि त्यांनी उत्पादित केलेली नाचणी त्यांनी त्यांच्या आहारात जास्तीत-जास्त वापरावी या उद्देशाने कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या किसान गोष्टी कार्यक्रमाद्वारे पन्हाळा तालुक्यातील किसरुळ या गावात महिलांसाठी ‘नाचणीयुक्त पदार्थ निर्मिती’ ची स्पर्धा आयोजित केली. महिलांनी घरुन कोणताही एक नाचणीयुक्त पदार्थ बनवून स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा स्थळी आणायचा असे ठरले होते. त्यानुसार 18 नोव्हेंबर 2018 रोजी या स्पर्धेत 64 महिलांनी 78 वेगवेगळे नाचणीचे पदार्थ घरातून तयार करुन आणून मांडले होते.
यात नाचणीचे मोदक, करंज्या, चकल्या, गुलाबजाम, भेळ असे नानाविध पदार्थ स्पर्धेत आणले होते. यातुन तिखट, टिकाऊ आणि गोड पदार्थ अशा वर्गवारीत तज्ज्ञांकडून परिक्षण करुन विजेत्यांना प्रमाणपत्र आणि लिंबुचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. उद्देश एकच होता की, नाचणी केवळ भाकरीच्या स्वरुपातच आहारात आणली जात नाही तर नाचणीचा आहारात समावेश करण्यासाठी कितीतरी पदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत.
देश स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पौष्टिक लघु तृणधान्य श्रेणीतील सर्वाधिक उत्पादन घेतल्या जाणा-या नाचणी पिकाचे क्षेत्र वाढवायचे तर बियाणाची कमतरता जाणवणार. या पार्श्वभूमीवर नाचणीचे गैरहंगामी बिजोत्पादन घेतले जाऊ शकेल का यावर विचारमंथन सुरु असतानाच पन्हाळा तालुक्यात आत्मा, महाबीज आणि राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, शेंडापार्क यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी हंगामात नाचणी बिजोत्पादन कार्यक्रमाची पूर्वतयारी केली.
पन्हाळा तालुक्यात नाचणीचे खरीपात उत्पादन घेणा-या शेतक-यांकडे जिथे पाण्याची सोय उपलब्ध आहे, अशा ठिकाणी नाचणीचे बिजोत्पादन घेण्यासाठी शेतक-यांचे प्रबोधन सुरु केले. बहुतांश शेतकरी गैर हंगामी नाचणी उत्पादन येईल याबाबत कमालीचे साशंक होते. परंतु, हा प्रयोग राबवण्यासाठी 18 शेतकरी तयार झाले. 15 एकर क्षेत्रावर प्रयोग निश्चित झाला. आत्माच्या पीक प्रात्यक्षिक बाबींमधून शेतक-यांना फुले, नाचणी या अधिक उत्पादनक्षम वाणाचे बियाणे, युरिया ब्रिकेट्स, एक तणनाशक, दोन बुरशीनाशके आणि एक किटकनाशक अशा प्रात्यक्षिक निविष्ठा देण्यात आल्या. 15 डिसेंबर 2018 ला गादी वाफ्यावर बियाण्यांची पेरणी झाली. 5 ते 10 जानेवारीच्या दरम्यान रोपांची मुख्य शेतात लागवड करण्यात आली.
बिजोत्पादन प्रयोगातील नाचणी पिकावर काही प्रमाणात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसुन आला पण कोणत्याही प्रकारच्या इतर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसुन आला नाही. गरजेनुसार पाणी आणि अत्यल्प प्रमाणात खते दिली गेल्याने पिकांची वाढ चांगली झाली. खरीपापेक्षा पिकाची उंची, फुटवा आणि पालेदार वाढ अधिक उत्कृष्ट दिसुन आली. खरीपात या भागात नाचणीचे प्रती एकरी उत्पादन साधारण 4 ते 6 क्विंटल मिळते. पण उन्हाळी हंगामात नाचणीचे सर्वसाधारणपणे 16 ते 18 क्विंटल उत्पादन शेतक-यांना मिळाले. खरीपात नाचणी पीक डोंगर उतारावर अत्यल्प कमी असणा-या मुरमाड जमीनीवर पूर्णतः निसर्गावर अवलंबून घेतले जाते. उन्हाळी हंगामात मात्र काटेकोर नियोजनामुळे उत्पादनाचे नवे रेकॉर्ड तयार झाले.
काही तांत्रिक अडचणींमुळे बिजोत्पादन म्हणून जरी हा प्रयोग असफल झाला असला तरी उन्हाळी हंगामात ऊस सोडून कमी खर्चात येणा-या एका दुर्लक्षित राहिलेल्या पिकाचा या प्रयोगाच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध झाला. उन्हाळी हंगामात नाचणी धान्याचे उत्पादन तर मिळालेच पण शिवाय ऐन चारा टंचाईच्या काळात हिरवागार सकस चाराही शेतकऱ्यांसाठी हे पीक दुहेरी फायदा देणारे ठरले.
पहिल्या वर्षी केवळ पंधरा एकरांवर राबविलेल्या प्रयोगाच्या यशानंतर दुसऱ्या वर्षी पन्हाळा तालुक्यात 110 एकरांवर उन्हाळी नाचणीची लागवड झाली. कोल्हापूर जिल्ह्यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात देखील यानंतर उन्हाळी नाचणीच्या लागवडीबाबत प्रात्यक्षिके राबविण्यात आली. पहिल्या प्रयोगानंतर राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी नाचणी लागवडीबाबत चौकशी करु लागले, बियाणांची मागणी करु लागले.
प्रयोगासाठी धजावलेले पहिले 18 शिलेदार शेतकरी प्रत्येक नव्या शेतक-याला आपापल्या परीने बियाणे पाठवायचे, फोनवरुन मार्गदर्शन करायचे. पण यात एक सूत्रबद्धता यावी या उद्देशाने जिल्ह्यातील 10 प्रयोगशील पौष्टिक लघु तृणधान्य उत्पादक शेतक-यांची मिळुन एक ‘मिलेट असोसिएशन कोल्हापूर’ या नावाने एक स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली. सध्या या संस्थेच्या माध्यमातून पौष्टिक लघुतृणधान्य पिकांच्या लागवडीबाबत नवनवे प्रयोग करुन निरिक्षणे नोंदवली जात आहेत.
राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पांतर्गत नाचणी सुधार प्रकल्पाचे नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन, कृषि विज्ञान केंद्र तळसंदेचे जयवंत जगताप, कृषि महाविद्यालय कोल्हापूरचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ यांचे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. यापुढील काळात पौष्टिक लघुतृणधान्य उत्पादन ते प्रक्रिया आणि बल्कमधे विपणनासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना उन्हाळी नाचणी उत्पादनाचा हा प्रयोग राज्यात इतर शेतक-यांसाठी अनुकरणीय ठरला आहे. आता जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना जिल्ह्यात या पिकांच्या लागवड, प्रक्रिया, विपणन आणि आहारातील वापर वाढविण्याच्या उद्देशाने आम्ही कृषि विभाग आणि आत्माच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
– जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तथा प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर
शिरोळ तालुका ऊस उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. पण घरच्या सदस्यांचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने आहारात थोडे बदल करुन दिवसातून एकवेळेस का होईना नाचणीची भाकरी ताटात असायला पाहिजे, असे नियोजन केले आणि त्यानुसार गेल्या खरीपात 20 गुंठे ऊस पिकात नाचणीचे आंतरपीक घेऊन नाचणीचे 6 क्विंटल उत्पादन मिळवले आहे. आता घरचेच बियाणे दरवर्षी पेरून नाचणी उत्पादन आणि आहारात नाचणीचा नित्य समावेश हा शिरस्ता कायम ठेवण्याचा माझा मानस आहे.
– सचिन शेडशाळे, प्रयोगशील सेंद्रिय शेतकरी, जयसिंगपूर, ता.शिरोळ, कोल्हापूर
Nachani Production in Summer Successful in Kolhapur