नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): नुकत्याच वर्तमानपत्रात व वृत्तवहिन्यांवर प्रसारीत झालेल्या बातमीत 125- नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदार संघामधील एका मतदाराकडे तीन मतदार ओळखपत्र अशा आशयाच्या बातम्या प्रसारीत झाल्या आहेत. त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी 125- नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदार संघ यांनी वस्तुस्थिती अहवाल सादर केला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या अहवालानुसार 125- नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदार संघात यादी भाग 52, अ.क्र 1428 वर सुनील रविंद्र वाजपेयी यांचे मतदार ओळपत्र TGY8797748 आहे. परंतु सदर मतदार यांनी 20 मे 2024 रोजी स्थलांतर कामी फॉर्म नं 8 भरला होता. तो मंजुर झाल्याने त्यांना जुना EPIC क्रमांक TGY8797748 चे नवीन EPIC कार्ड मिळाले. दोन्ही नंबर एकच असून नाव देखील एकदाच आहे, दुबार नाही. तसेच पहिले जुने EPIC सन 2019 वर्षातील आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे तीन ओळखपत्र असून तीनही वेगवेगळे नाहीत.
मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे (नमुना 6), नावे कमी करणे (नमुना 7) व तपशिलामध्ये दुरूस्ती करणे (नमुना 8) ही वर्षभर निरंतर चालणारी प्रक्रिया असून दरवर्षी भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मोहीम स्वरूपात मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रिया राबविण्यात येते. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना किंवा ऑनलाईन सादर केलेल्या या विविध अर्जांवर मतदार नोंदणी अधिकारी आवश्यक कागदपत्रांची तपासणी वा दुरूस्ती करून संबंधित मतदारास मतदार ओळखपत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात येते. नमुना 8 द्वारे नावमध्ये दुरूस्ती, फोटोमध्ये बदल, पत्त्यामध्ये बदल, जन्मतारखेत बदल, व मोबाईल क्रमांक दुरूस्ती करण्यात येते.
नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदार संघांतर्गत 1 जानेवारी 2025 पासुन आजअखेर एकूण 39 हजार 271 इतक्या मतदारांना नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेली आहेत. एकाच मतदाराचे अनेक ओळखपत्र यामागील वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी केले आहे.