मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) निश्चित केला जातो. त्यासाठी करण्यात येणाऱ्या मूल्यांकनासाठी यूजीसीने सुधारित निकष आणि गुणभार जाहीर केले आहे. चालू सत्रापसून याच निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे.
देशतील उच्च शिक्षण संस्थांना नॅक मूल्यांकन बंधनकारक आहे. हाच गुणवत्तेचा महत्त्वपूर्ण निकष मानला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात आला आहे. नॅक मूल्यांकन बंधनकारक असूनही देशभरातील अनेक उच्च शिक्षण संस्थांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. तसेच नॅक मूल्यांकन प्रक्रियेत उच्च मूल्यांकन श्रेणी मिळण्यासाठी खासगी सल्लागाराची मदत घेण्यासारखे प्रकारही निदर्शनास आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘यूजीसी’कडून मूल्यांकनातील निकष बदलण्यात आले आहेत.
स्वायत्त महाविद्यालये, संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे स्वतंत्र निकष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आतापर्यंत मूल्यांकनाचा आराखडा निश्चित होता. मात्र, त्यासाठीचा गुणभार जाहीर करण्यात आलेले नव्हते. आता निकषांबाबत स्पष्टता झाल्याने महाविद्यालयांनी कोणत्या पद्धतीने काम करावे ते नेमकेपणे समजणार आहे. प्रक्रियेतील पारदर्शकतेचे महाविद्यालयांनी स्वागत केले आहे.
प्रत्येक घटकाशाठी स्वतंत्र गुण
विद्यापीठांच्या मूल्यांकनासाठी अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन आणि नवे उपक्रम, पायाभूत सुविधा आणि अध्ययन स्रोत, प्रशासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती हे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यातील प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र गुणभार देण्यात आला आहे. तसेच स्वायत्त महाविद्यालये आणि संलग्नित महाविद्यालयांसाठीच्या निकषांमध्ये अंतर्गत गुणवत्ता सिद्धता, संस्थात्मक मूल्ये आणि सर्वोत्तम कृती हे दोन स्वतंत्र घटक आहेत.
यासंदर्भात नॅकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले की, निकष आणि त्यासाठीचा गुणभार जाहीर करण्यात आल्याने प्रक्रियेत पारदर्शकता येईल. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांचे कोणत्या निकषांवर मूल्यमापन होणार, हे समजू शकेल. या निकषांवर हरकती-सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. आता महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांची गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न करता येतील.
NAAC Declared New Criteria’s for Educational Institutes