अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना विषाणूच्या आजाराचे थैमान संपत नाही तोच आता रहस्यमय आजाराने डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे, हा आजार लहान मुलांना लक्ष्य बनवित आहे. ब्रिटनमध्ये विषाणूजन्य हिपॅटायटीस असलेल्या ७७ टक्के मुलांना एडिनोव्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेतील मुलांमध्येही एडेनोव्हायरस आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी सांगितले की, किमान २० मुलांना कोविड आणि एडेनोव्हायरस या दोन्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे मुलांच्या यकृताला जळजळ होण्यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
१ मे पर्यंत, जगभरातील २०हून अधिक देशांमधील दोनशेहून अधिक मुले गूढ यकृताच्या आजाराने बाधित झाली आहेत. युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर आली असून त्यापैकी १०० हून अधिक प्रकरणे एकट्या ब्रिटनमध्ये आढळून आली आहेत. बळींचे वय शून्य ते १७ वर्षे होते, ज्यात पाच वर्षांखालील मुलांची सर्वाधिक संख्या होती. अमेरिकेतील अलाबामामध्ये नऊ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एप्रिलच्या अखेरीस स्कॉटलंडमधील १० मुले एकाच वेळी आजारी असल्याचे आढळून आल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) याकडे लक्ष वेधले गेले.
या मुलांचे यकृत आजाराच्या विळख्यात आल्यानंतर गंभीर नुकसान होत आहे. २० मुलांचे यकृत प्रत्यारोपणही करावे लागले, तर एका बालकाचा यकृत निकामी झाल्याने मृत्यू झाला आहे. १० टक्के प्रकरणांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याचे समोर येत आहे. या आजाराबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. यूकेमध्ये, विषाणूजन्य हिपॅटायटीस असलेल्या ७७ टक्के मुलांना एडिनोव्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेतील मुलांमध्येही एडेनोव्हायरस आढळून आला आहे. या आजाराबाबत अजून संशोधन आणि ठोस माहिती मिळण्याची गरज आहे. एडेनोव्हायरसची लागण त्याच मुलांमध्ये होत आहे जे हिपॅटायटीस रुग्ण असून, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, असे मात्र आतापर्यंत समोर आले आहे.
हिपॅटायटीस म्हणजे
हिपॅटायटीस हा यकृताच्या जळजळीला वैद्यकीय संज्ञा आहे. ही जळजळ एखाद्या संसर्गास किंवा दुखापतीला रोगप्रतिकारक प्रतिसाद म्हणून उद्भवते. हिपॅटायटीस ए, बी, सी, डी आणि ई हे पाच प्रकारच्या विषाणूंमुळे होतात.
अशी आहेत लक्षणे
यूकेएचएसएच्या इन्फेक्शन अफेयर्सच्या संचालक डॉ. मीरा चंद यांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या यकृताला सूज आल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आले.
याशिवाय पोटदुखी, जुलाब, उलट्या या लक्षणांसोबतच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडणे, लघवीचा रंग गडद होणे, त्वचा, स्नायू व सांधे यांना खाज सुटणे, ताप, थकवा, अंग गळणे अशी कावीळची लक्षणे दिसून येतात. भूक पण दिसली आहे.
अशी घ्या काळजी..
काहीही खाताना आपले आणि मुलांचे हात साबणाने धुवा
मुलांना न धुतलेल्या हातांनी त्यांचे डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू देऊ नका
मुलांना आजारी लोकांकडे नेऊ नका
या देशांमध्ये रुग्ण
यूएसए, यूके, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड, नॉर्वे, फ्रान्स, रोमानिया, बेल्जियम, जपान, इस्रायल, स्पेन, इटली, जर्मनी, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, स्वीडन, तुर्की, कॅनडा आणि ग्रीस.