न्यूयॉर्क – म्यानमार मधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याटे दिसून येत आहे. म्यानमारमधील लष्कराने नागरिकांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आता अमानुषपणाचा कळस गाठला आहे. यासाठीच लष्कराने थेट रस्त्यांवरच दारूगोळा आणि सुरुंग पेरले आहेत. ही बाब कळताच जीव वाचवण्यासाठी हजारो नागरिक सैरभैर धावत आहेत. याबद्दल संयुक्त राष्ट्राने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे स्वतंत्र मानवाधिकार तज्ज्ञ टॉम अँड्र्यूज यांनी म्यानमारमधील लष्करी राजवटीतील नरसंहार रोखण्यासाठी लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय कारवाईची मागणी केली आहे. लष्कराकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी म्यानमारमधील हजारो नागरिकांनी सीमेवरच्या इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. त्याच काहींनी जंगलाच घरे बनविली आहेत. परंतु तेथे त्यांच्याकडे सर्व आवश्यक गोष्टींचा अभाव आहे. यामुळे त्याच्या जीवावर संकटाचे ढग दाटून आले आहेत.
या देशातील सैन्याने सार्वजनिक रस्त्यांवर अनेक ठिकाणी सुरुंग घातले आहेत. अँड्र्यूज यांनी म्यानमारच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून ते म्हणतात की, या देशात लष्करी शासन अस्तित्वात आले आहे तेव्हापासून लोकांच्या जीवावर संकट ओढवले आहे.
सैन्याच्या तावडीतून सुटण्यासाठी लाखो लोकांना घरातून बेघर व्हावे लागले. सैन्याने अशा लोकांची अन्नपुरवठा आणि रेशन तोडले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत, उपासमारीमुळे हजारो लोक मरण पावले आहेत. तसेच मोठ्या संख्येने लोक स्थलांतर करीत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कृती करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.