गौतम संचेती, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी आहेत. पुणे विद्यापीठापेक्षाही मविप्रचा अर्थसंकल्प मोठा आहे. मविप्रचा अर्थसंकल्प १ हजार कोटींच्या पुढे नेण्याबाबत यंदाच्या निवडणुकीत जोरदार चर्चा सुरू आहे. परिवर्तन आणि प्रगती पॅनलच्यावतीने जोरदार प्रचार केला जात आहे. या निवडणुकीच्या सद्यस्थितीचा परामर्श घेणारा हा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट….
येत्या २८ ऑगस्ट रोजी होणा-या या निवडणुकीत परिवर्तनाची नांदी दिसेल, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. सत्ताधारी प्रगती पॅनलच्या निलीमा पवार यांच्या नेतृत्वातील गटाला या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांच्या गतीला नाराजीचा ब्रेक बसणार असल्याचे संकेत मतदारांकडून मिळत आहेत. असे असले तरी या निवडणुकीत एकूणच नाती गोती, संबध, राजकीय नेत्यांची भूमिका, वाढलेले मतदार, कर्मचा-यांच्या बदल्या व मतदारांना दिले जाणारे आमिष या गोष्टी मतदानावर कितपत परिणामकारक करतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत बहुतांश मतदार पॅनल टु पॅनल मतदान करणार नसल्याची गोष्टही समोर आल्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत एकाच पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येईल याची शक्यता कमी असल्याचेही काही ज्येष्ठांचे मत आहे. त्यामुळे कोणत्या पॅनलला किती जागा मिळतात व पदाधिकारी कोण निवडून येतात यावरच पुढचे सारे काही अवलंबून आहे.
या निवडणुकीत निलीमा पवार यांच्या सत्ताधारी गटाला मतदारांच्या नाराजीची जाणिव अगोदरच झाल्यामुळे त्यांनी सुद्धा कंबर कसली आहे. ती दूर करण्याच्या दिशेने त्यांनी अनेक पाऊल उचलली आहेत. त्यासाठी जोरदार प्रयत्नही केले. पण, तरी संपूर्ण नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले नसल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत केलेल्या कामामुळे मतदार आपल्याला कौल देईल अशी आशा पवार गटाला आहे. या गटाने काही विद्यमानांना संधी न देता नव्या दमाच्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे त्याचा काहीसा फायदा त्यांना होणार आहे.
आतापर्यंत केलेल्या कामाला पसंती व मतदारांची नाराजी दूर करण्यात यश आले तर प्रगतीची गती वाढेल व हे पॅनल परिवर्तनला रोखू शकेल. शेवटच्या टप्यात या निवडणुकीत अॅड नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनल काँटे की टक्कर देत आहे. गेल्या निवडणुकीत अॅड. नितीन ठाकरे यांच्या पॅनलचा निसटता पराभव झाला होता. पण, त्यानंतर त्यांनी पाच वर्ष सातत्याने मतदारांशी ठेवलेला संपर्क व त्याचबरोबर संस्थेच्या कामावर ठेवलेली करडी नजर त्यांना या निवडणुकीत फायद्याची ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचे पॅनल कमकुवत होते, पण, यावेळेस अनेक दिग्गज त्यांच्या पॅनलमध्ये असल्यामुळे त्याचाही फायदा त्यांना होणार आहे.
निफाड तालुक्यात मोठी फाटाफूट
अंत्यत चुरशीच्या या निवडणुकीत १० हजार १९७ मतदार आपला हक्क बजावणार असून त्यात सर्वाधिक लक्ष निफाड तालुक्यातील २ हजार ९०३ मतांकडे लागले आहे. निफाड तालुक्यात एकूण १० उमेदवार रिंगणात असून त्यात प्रगतीचे चार तर परिवर्तनचे सहा उमेदवार आहेत. त्यामुळे येथील मतदार संपू्र्ण निवडणुकीचे गणित बदलू शकतात असे चित्र आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत या तालुक्यातून पवार गटाच्या प्रगतीचे वर्चस्व होते. पण, यावेळेस या तालु्क्यात मोठी फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत. त्याचा फायदा परिवर्तन पॅनलला मिळणार आहे. उर्वरीत तालुक्यातही चुरस असून पदाधिका-यांच्या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे महत्त्वाचे असणार आहे.
इतर तालुक्यातही काँटे की टक्कर
निफाड नंतर सर्वाधिक १४१६ मते सटाणा येथे आहेत. त्यानंतर नाशिक शहर येथे ८७६, दिंडोरी – पेठ ८३८, मालेगाव ७८३, नाशिक ग्रामीण ७०७, चांदवड ६८४, देवळा ५६७, सिन्नर ४४३, कळवण-सुरगाणा ३४८ असे मतदान आहे. तर नांदगाव -२९२, येवला २०२, इगतपुरी १३८ या तालुक्यात सर्वाधिक कमी मतदान आहे. यातील बहुतांश तालुक्यात एकाच पॅनलला मतदान होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथेही काँटे की टक्कर आहे.
गेल्या निवडणुकीत विजयी व पराभूत
गेल्या निवडणुकीत विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतदानावर नजर टाकली तर सर्वच ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी ४ हजार मतांचा टप्पा गाठला होता. त्यात ६ उमेदवारांचा पराभव हा ५०० मतांच्या आत आहे. त्यात सरचिटणीसपदाचे उमेदवार अॅड. नितीन ठाकरे यांचा पराभव अवघ्या १४३ मतांनी झाला आहे. त्याचबरोबर निफाडचे संपतराव गावले यांचा १८८ तर दिंडोरीचे सुरेश डोखळे यांचाही केवळ २०६ मतांनीत पराभव झाला होता. या पराभूत उमेदवारांपैकी ७०० च्या आसपास मतांनी पराभूत झालेल्यांची संख्या सात आहे. तर एक हजाराच्या फरकाने ५ उमेदवार पराभूत झाले. गेल्या निवडणुकीत काहीशा फरकाने पराभूत झालेला ठाकरे गट या निवडणुकीत मात्र हा फरक कमी करुन विजयाकडे जाऊ शकतो…
पवारांची पॉवर व भाजपचे वर्चस्व
मविप्र निवडणुकीत राजकीय पायघड्या बाजूला सारून पॅनल तयार केले जाते. पण, तरी सुद्धा प्रगतीवर भाजपचे वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे. तर ठाकरे गटाला पवारांची पॉवर असल्याची चर्चा आहे. त्यात शिवसेनेची ताकदही बरोबर असल्याचे बोलले जात आहे. पण, दोन्ही पॅनलमध्ये सर्वच पक्षांचे उमेदवार असल्यामुळे ही चर्चाच आहे…
ज्येष्ठ उमेदवार व आक्रमक, संयमी
प्रगतीमध्ये असलेल्या ज्येष्ठ उमेदवारांचे वाढते वय व आजारपणाच्या तक्रारी सुद्धा या निवडणुकीत एक चर्चेचा मुद्दा आहे. पण, त्यांच्यावर असलेला विश्वास ही त्यांची जमेची बाजू आहे. तर दुसरीकडे परिवर्तन पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी असलेले उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे हे आक्रमक आहेत तर सरचिटणीस पदाचे उमेदवार अॅड. नितीन ठाकरे हे संयमी आहेत.
अंगठी व पन्नास हजाराची चर्चा
गेल्या निवडणुकीत मतदारांना अंगठी देण्यात आल्याची चर्चा होती. यावेळी ५० हजाराची चर्चा आहे. आता ही चर्चा आहे की वाटप केले जाते ते अद्याप पुढे आलेले नाही. पण, या वाटपाच्या चर्चेमुळे या निवडणुकीवर परिणाम होईल का? हा प्रश्न दिग्गजांना पडला हे मात्र खरं आहे…
MVP Election Special Ground Report Pragati And Parivartan Panel
Nilima Pawar Adv Nitin Thakre Educational Institute
Gautam Sancheti