संस्था अधोगतीकडे नेणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा: ॲड नितीन ठाकरे
नाशिक – विद्यमान सरचिटणीस व त्यांचे कुटुंब गैरप्रकरणांना खतपाणी घालत असून त्यामुळे दादा,ताई आणि मॅडम या महाआघाडीचा संस्था गिळंकृत करण्याचा डाव सभासदांनी वेळीच ओळखून त्यांना घरी बसवण्याचे आवाहन ॲड नितीन ठाकरे यांनी केले.परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचे रणशिंग कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांच्या गावी चाटोरी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ वाढवून फुंकले.त्यानंतर झालेल्या मेळाव्यात पॅनलचे नेते ठाकरे यांनी विद्यमान कार्यकारी मंडळ हे अकार्यक्षम असल्याची टीका करत अनेक मुद्यांना हात घातला. त्यांनी पॅनलच्या सर्व उमेदवारांचा परिचय करून देत त्यांचा परिचय करून दिला. यावेळी उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
सभेचे अध्यक्ष कोंडाजी खेलुकर यांनी परिवर्तन होणारच असे सांगितले. भाऊसाहेब सोनवणे यांनी संस्थेत एडमिशन बाबत सुरू असलेले दुतोंडी धोरण घातक असून लुटमार करणाऱ्यांना हद्दपार करण्याचे आवाहन केले.सभापतीपदाचे उमेदवार बाळासाहेब क्षीरसागर यांनी संस्थेत लोकशाही आणण्यासाठी परिवर्तन करण्याचे आवाहन केले.
नगरसेवक अजय बोरस्ते यांनी प्रतापदादा सोनवणे यांनी लिहून दिलेले भाषण वाचले. विजय करंजकर यांनी अनेक विषयांना आपल्या खास शैलीत हात घालत चौफेर टीका केली. नानासाहेब खालकर,डॉ. विजया गायकवाड, सुधाकर मोगल, सदाशिव खेलुकर, प्रा.रवी मोरे, निर्मला खर्डे, सिध्दार्थ वनारसे, शिरीष राजे यांचे भाषण झाले. यावेळी बापूसाहेब मोगल, अरविंद कारे, नानासाहेब बोरस्ते, अशोक कुंदे, विलास शिंदे, कृष्णाजी भगत, संदीप गुळवे आदी उपस्थित होते.
भ्रष्ट कारभाराचे वाभाडे
सेवक संचालक नानासाहेब दाते यांनी पुराव्यानिशी कार्यकारी मंडळाने कसा भ्रष्ट कारभार केला याचे वाभाडे काढले. तुटपुंज्या पगारावर वणी येथील एका सेवकाने आत्म्हतेयचा केलेला प्रयत्न लपवला गेल्याचे त्यांनी पुराव्यानिशी सांगताच उपस्थित सभासद अवाक झाले.
ठाकरेंनी केला शब्द पूर्ण: आ.कोकाटे
नितीन ठाकरे हे शब्दाला जगणारे असून त्यांनी प्रचाराचा नारळ व जाहीरनामा कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांच्याच जन्मभूमीत शुभारंभ करण्याचे वचन निफाडकरांना दिले होते.त्यांनी दिलेला हा बहुमान तालुका स्मरणात ठेवेल असे सांगत कर्मवीरांना अभिप्रेत असलेले काम संस्थेत होईल असे वचन दिले.