नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था पब्लिक ट्रस्ट असुन या संस्थेचा सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक व संपूर्ण नोंदणी क्रमांक A-४३६ आहे सदर संस्थेचे साधारणतः १०००० सभासद असून संस्थेकडे अनेक वेळा नवीन झालेल्या सभासदांची यादी व संस्थेच्या विविध शाखांचा ऑडिट रिपोर्ट मागितला असता जाणीवपूर्वक देण्यात आला नसल्याची तक्रार संस्थेचे माजी सभापती अॅड. नितीन बाबुराव ठाकरे यांनी सहा. धर्मदाय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीत त्यांनी संस्थेच्या ऑगस्ट २०२२ ला होऊ घातलेल्या निवडणुकीत संस्थेच्या निवडणुकीमध्ये घटनेची व भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करून विद्यमान कार्यकारी मंडळीस उपयुक्त अशी निवडणूक नियमावली करण्याचे बेकायदेशीर प्रयत्न संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सुरू केले आहे. तसेच मागील २०१७ च्या निवडणुकीत संस्थेच्या कार्यकारिणीच्या मर्जीतील कर्मचारी वर्ग निवडणुकीकरिता वापरला होता. तसेच संस्थेच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मर्जीतील कर्मचाऱ्याकडून मतपत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्यामुळे डुप्लिकेट मतपत्रिका छापून कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरकारभार करून मतमोजणी मध्ये गोंधळ करण्यात आला होता. तसेच संस्थेने नेमलेल्या त्यांच्या मर्जीतील निवडणूक मंडळाने पक्षपातीपणा करून संपूर्णपणे निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली होती. म्हणुनच ऑगस्ट २०२२ मध्ये होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अशाच प्रकारचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो व त्यामुळे काही अघटित घटना होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मविप्र शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीला काही गालबोट लागण्यापूर्वी सदर निवडणूक प्रक्रिया आपल्या कार्यालयाच्या वतीने राबविण्यात यावी, तसेच मतमोजणी कक्षामध्ये व कक्षा बाहेर मुबलक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश द्यावे व संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे स्क्रीनवर सभासदांना दिसावी, त्याचप्रमाणे मतमोजणीच्या ठिकाणी व बाहेर मुबलक प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील असावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी त्रयस्थ निरीक्षक नेमावेत. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नसावा. मागील मतमोजणीच्या काळात अचानक लाईट घालवल्याने मतमोजणी प्रक्रियेत व्यत्यय आला. तसेच अंधाराचा गैरफायदा घेण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे यावेळेस मतमोजणी काळात जनरेटरची व्यवस्था पूर्ण वेळ व्यवस्था असावी. मतमोजणी प्रक्रियेच्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था असल्याकारणाने अनाधिकृत साहित्य मतमोजणीच्या ठिकाणी आत मध्ये येते व बाहेर जाते याची देखील खबरदारी घ्यावी असे म्हटले आहे.