इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे आता एवढे सोपे झालेले आहे , कारण फारशी कागदपत्रे न देता सुद्धा आपण अनेक फंडमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल विचार करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना केव्हायसी पूर्ण करावे लागते, ही एकदाच करण्याची प्रक्रिया आहे. आपण एखाद्या वितरकाकडे किंवा गुंतवणूक सल्लागाराकडे जाऊन केव्हायसी पूर्ण करण्यास मदत मागू शकता किंवा आपण ऑनलाइन ई-केव्हायसी पूर्ण करू शकता.
म्युच्युअल फंड साठी एकदा केव्हायसी पूर्ण केल्यावर आपण कुठल्याही फंडमध्ये गुंतवणूक करू शकता, त्यासाठी प्रत्येक वेळी इतर तपासणी गरज नसते. केवायसी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण गुंतवणूक करण्यासाठी तयार असता, तेव्हा आपण म्युच्युअल फंड वितरक, नोंदणी केलेले गुंतवणूक सल्लागार, स्टॉक मार्केटमधील ब्रोकर, बँक किंवा इतर आर्थिक मध्यस्थाच्या मदतीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. पण जर आपल्याला स्वतः गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर आपण एखाद्या फंड हाउसच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता.
गुंतवणुकीच्या इतर योजनांपेक्षा दिर्घ मुदतीत चांगला परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अपरिहार्य आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) मानला जातो. याद्वारे, गुंतवणूकदार नियमितपणे विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी मिळतात. मात्र, गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.
गुंतवणूकीपूर्वी आपले लक्ष्य निश्चित करणे खूप महत्वाचे आहे. बजेट, गुंतवणूक कालावधी आणि गुंतवणूकीचे फायदे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूकीपूर्वी हे निश्चित करा की, तुम्ही कोणत्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक करीत आहात. उदा. मुलाचे शिक्षण किंवा मुलीचे लग्न लक्षात घेऊन गुंतवणूक करा. तुम्हाला किती गुंतवणूक करता येईल, ती किती काळासाठी शक्य आहे याचाही विचार करणं आवश्यक आहे. आजकाल अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. हा ट्रेंड आता वाढत आहे.
नव्या गुंतवणूकदारांना मात्र म्युच्युअल फंडाबद्दल संपूर्ण माहिती नसते. तसेच म्युच्युअल फंडाबद्दल गैरसमज असणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.आता म्युच्युअल फंडाबद्दल असणाऱ्या पाच गैरसमजांविषयी आपण जाणून घेऊयात. पहिला म्हणजे म्युच्युअल फंड हे जोखीम मुक्त असतात. म्युच्युअल फंडात कोणत्याही प्रकारची जोखीम नसते असे बऱ्याच जणांना वाटते. परंतु टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींच्या शेवटी मात्र सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असे देखील सांगण्यात येते.
विशेष म्हणजेच इक्विटी मार्केट फंडात गुंतवणूक केल्यानंतर शेअर्सची किंमत कमी होते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडांची नेट असेट व्हॅल्यू देखील घसरू शकते. तसेच डेट फंडातदेखील व्याजदरांचा चढ-उतारांच्या जोखीमेचा समावेश असतो. तुम्ही जास्त परताव्याची अपेक्षा ठेवल्यास जोखिमही जास्त असते. तसेच फंडाचा परतावा हा अंडरलाइंग सिक्युरिटी बाजारातील चढ-उतरांवर अवलंबून असतो. त्यामुळे शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर इक्विटी फंडाचा परतावा निगेटिव्ह म्हणजेच खूप कमी असतो.
कमी NAV मध्ये गुंतवणूक केल्यास कमी तर जास्त NAV फंडापेक्षा जास्त रिटर्न मिळेल असे बऱ्याच जणांना वाटते. पण हे खरं नाही. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या स्कीम A च्या NFO मध्ये 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली. A स्कीमची NAV 10 रुपये आहे आणि अशाच प्रकारे तु्म्ही जुन्या स्कीम B मध्ये 20 हजार रुपये गुंतवले ज्याची NAV 20 रुपये आहे. अशाप्रकारे स्कीम A चे तुम्हाला 2 हजार युनिट्स आणि B चे 1 हजार युनिट्स मिळतात.
आता या दोन्ही फंडानं एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात गुंतवणुकीत दहा टक्के वाढ झाली. यामुळे दोन्ही फंडांची NAV 10 टक्क्यांनी वाढेल म्हणजेच A आणि B फंडाची NAV 11 रुपये आणि 22 रुपये होणार.या दोन्ही स्कीममधील गुंतवणुकीची किंमत 22 हजार रुपये होणार. अशाप्रकारे या दोन्ही योजनांवर 10 टक्के परतावा मिळतो.
जास्त परतावा मिळतो म्हणून सर्वच म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात असे सर्वांना वाटते. परंतु असं नाही, म्युच्युअल फंड इक्विटी,डेट, सरकारी रोखे आणि रिअल इस्टेट ट्रस्टमध्ये देखील गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड विविध प्रकारचे असतात.
केवळ दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड असतात असे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. हे ही अर्धसत्य आहे. 5 किंवा अधिक वर्षांच्या कालावधीसाठी चांगला परतावा मिळतो. पण अल्प मुदतीचे फंड देखील असतात. हे फंड डेट किंवा लिक्विड फंड असतात. या फंडातून परतावा तुलनेनं कमी मिळतो.
अल्प मुदतीचा फंडाचा परतावा हा FD आणि RD पेक्षा जास्त असतो. तुमचे म्युच्युअल फंडाबद्दल असणारे सर्व गैरसमज आता दूर झाले असतीलच. म्युच्युअल फंडांबाबत ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा संपूर्ण माहिती घ्या. त्यानंतर नियोजन करून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चांगली रक्कम जमा करणे सहज शक्य होते.
Mutual Funds Investment Guide Tips
Finance Money Share Market Business