इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही पुरुष किंवा स्त्री जन्माला आल्यानंतर आई-वडिलांचा जो धर्म असतो तोच त्यांचा धर्म बनतो. मात्र कालांतराने त्या व्यक्तीला सज्ञान झाल्यावर कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे किंवा धर्मांतर करण्याचे स्वातंत्र्य असते, असे म्हटले जाते. परंतु या संदर्भात काही धर्मात तसेच काही देशांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते, असे गुंतागुंतीचे प्रकरण मलेशियात समोर आले असून यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे
मलेशियामध्ये धर्मांतराचे असेच एक प्रकरण समोर आले असून, त्यात एका मुस्लिम महिलेने आपण कधीही इस्लाम स्वीकारला नसल्याचे सांगितले आहे. स्थानिक उच्च न्यायालय हे येत्या १५ जून रोजी महिलेच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, तिला मुस्लिम पालकांनी जन्म दिला असला तरी तिने हा धर्म कधीच स्वीकारला नाही. सध्या मी बौद्ध धर्माचे पालन करीत असल्याचे तिने सांगितले आहे.
याचिकेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी दि. १५ जून रोजी निकाल देण्याचे सांगितले आहे. आपण मुस्लिम नसल्याचे न्यायालयाने जाहीर करावे, अशी मागणी महिलेने न्यायालयाकडे केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या याचिकेत शरिया न्यायालयाला इस्लाम धर्मातून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा अधिकार आहे की नाही? हे ठरवण्याची मागणीही न्यायालयाकडे केली आहे.
महिला शरिया उच्च न्यायालयाने जुलै २०२० च्या याचिकेवर डिसेंबर २०२१ मध्ये मुस्लिम धर्म सोडण्यास मान्यता देण्यास नकार दिला होता. या अंतरिम आदेशाला न्यायालयाने स्थगिती द्यावी, अशी महिलेची मागणी आहे. महिलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांचे म्हणणे आहे की, तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर तिचे पालनपोषण तिच्या आईने केले.
दरम्यान, तिच्या वकिलाने महिलेच्या आईवर इस्लाम धर्म लादण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. महिलेने आपल्या याचिकेत न्यायालयाला सांगितले की, तिने कधीही इस्लामची शिकवण स्वीकारली नाही. त्याचा त्यावर विश्वास नाही. ती नियमितपणे डुकराचे मांस आणि दारूचे सेवन करते, असेही या महिलेने न्यायालयाला सांगितले. मात्र इस्लाममध्ये हे निषिद्ध आहे. तथापि, बौद्ध धर्मात असे कोणतेही बंधन नाही, असे तिचे म्हणणे आहे.