नागपूर : प्रसिद्ध व ज्येष्ठ संगीतकार राम – लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. अखेर शुक्रवारी (दि. २१ ) रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राम लक्ष्मण यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकापेक्षा एक दमदार गाणी दिली. यात ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या चित्रपट आणि त्यातील गाण्याचा समावेश आहे. तसेच त्यांनी राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमांना संगीत दिले आहे. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.
दादांनी दिले राम – लक्ष्मण नाव
राम लक्ष्मण यांच्या जोडीतील लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील होय. तरूण वयातच विजय पाटील हे नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. मुंबई नगरीत त्यांनी संगीतकार राम – लक्ष्मण म्हणून इंडस्ट्रीत आपला ठसा उमटविला.मुंबईत आल्यानंतर त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रें ( म्हणजेच राम ) यांच्याशी झाली. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले.