नवी दिल्ली – पूर्वीच्या काळी दिवाळीच्या काळात गायक हे दीपक राग गात असत. पण, संगीत सम्राट तानसेन यांच्यानंतर कोणीच दीपक राग गाताना दिसत नाही. हा दीपक राग काय आहे आणि आजवर तो कुणी का गायला नाही हे आपण आज जाणून घेणार आहोत.
दिवाळीच्या दिवसांमध्ये हा राग गायला तर यातून निर्माण होणारी उष्णता ही दिव्याच्या ज्योतीत सामावली जाते. आणि यामुळे या रागाचा कोणताही विपरीत परिणाम गाणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या शरीरावर पडत नाही. यामुळेच दिवाळीत रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी हा राग गाण्याची पद्धती होती. या रागात सातही सूर आहेत. हा राग भगवान शंकरांच्या मुखातून निर्माण झाला असा समज आहे. बहुधा यामुळेच हा देवलोकात राग आहे असे मानले जाते.
तानसेन यांच्याविषयी
तानसेन यांचे मूळ नाव तनसुख तन्ना असे होते. १४८६ मध्ये त्यांचा जन्म ग्वाल्हेर जवळील एका गावात मकरंद पांडे यांच्या घरी झाला. लहानपणापासूनच ते पक्ष्यांचे – प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढत आणि गातही असत. एकदा स्वामी हरिदास यांची नजर तानसुख यांच्यावर पडली आणि त्यांनी त्यांना संगीताचे धडे दिले. ग्वाल्हेरची महाराणी मृगनयनी यांच्याकडूनही तनसुख यांनी गाण्याचे धडे घेतले. त्यानंतर बांधवगडचे राजा रामचंद्र जुदेव यांनी त्यांची राजगायक म्हणून नियुक्ती केली.
म्हणून पडले तानसेन नाव
एक दिवस अकबरच्या दरबारातील अबुल फजल याने तनसुख यांचे गाणे ऐकले. आणि त्यांनी अकबरला त्यांच्या दरबारात बोलावण्याची विनंती केली. त्यांचे गाणे ऐकून अकबरने त्यांना तानसेन हे नाव आणि संगीत सम्राट ही पदवी देखील दिली. तसेच आपल्या दरबारातील नवरत्नांमध्ये त्यांचा समावेश केला.
म्हणून गायला दीपक राग
तानसेन यांचे वाढते कौतुक दरबारातील इतर लोकांना सहन झाले नाही. आणि त्यांच्याविरोधात त्यांनी सम्राट अकबराचे कान भरले. तानसेन दीपक राग गातात, असे त्यांनी बादशहा अकबरला सांगितले. दिवाळीशिवाय अन्य कधीही हा राग गायला जात नाही, असे वारंवार सांगूनही अकबराने काहीही ऐकले नाही, आणि त्यांना तो राग गावा लागला. दीपक राग गेल्याने दिवे प्रज्वलित झाले. पण तानसेन यांच्या शरीराची लाही लाही होऊ लागली. दरबारात उपस्थित श्रोत्यांना सुद्धा या उष्णतेचा त्रास होऊ लागला. असह्य होऊन तानसेन घरी गेले. तेथे त्यांच्या मुलीने मल्हार राग गाऊन त्यांच्या शरीराची होत असलेली आग शांत केली. मात्र, असे म्हणतात की, त्यानंतर ते सतत आजारी राहू लागले आणि तीन वर्षांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ३० डिसेंबर रोजी मध्य प्रदेश सरकार दरवर्षी ग्वाल्हेर येथे तीन दिवसांच्या तानसेन संगीत समारोहाचे आयोजन करते.