मुंबई – नव्वदच्या दशकात संगीत जगातील सर्वात प्रसिद्ध नदीम-श्रवण जोडी सर्वांनाच माहित होती. कारण त्यावेळी त्यांच्या संगीताला खूप मागणी होती आणि सर्व संगीतप्रेमी हे नदीम-श्रावणबद्दलच बोलत असत. मात्र नुकतीच एक बातमी आली की, श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले आहे.
श्रावण राठोड एकेकाळी नदीम सैफीबरोबर गाणी बनवत असत. या जोडीवर संगीत रसिकानी आणि चित्रपट प्रेक्षकांनी खूप प्रेम केले होते. कारण या दोघांनीही संगीताच्या जगात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. यानंतर एक अशी वेळ आली की, ही जोडी यशाच्या शिखरावर चढली आणि त्यांची जोडी फुटली, जेव्हा नदीम सैफी यांच्यावर टी सिरीजचे संस्थापक गुलशनकुमार यांचा खून करण्याचा कट रचल्याचा आरोप केला गेला.
गुलशनकुमार यांना १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईच्या अंधेरी येथे यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. तेव्हा ही जोडी ‘आशिकी’ सारख्या सिनेमाला संगीत देत होती. २००५ मध्ये दोस्ती चित्रपटाच्या संगीतानंतर ही जोडी एकमेकापासून दूर गेली.
या जोडीने पहिल्यांदाच १९७९ मध्ये भोजपुरी चित्रपट ‘दंगल’ मध्ये संगीत दिले होते. पण नदीम-श्रावण यांना ओळख ‘आशिकी’ चित्रपटापासून मिळाली. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली. त्यांची जोडी गुलशन कुमारची टी सिरीजची आवडती जोडी होती. गुलशन कुमार यांच्या हत्येच्या आरोपावरून नदीम सैफी यांना देश सोडून लंडनमध्ये स्थायिक व्हावे लागले.
नदीम सैफी २००० पासून लंडनमध्ये राहत आहेत. दरम्यान १९९८ मध्ये नदीम यांच्यावर गुलशन कुमारची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर पुरावा नसल्यामुळे २००२ मध्ये कोर्टाने हा खटला रद्द केला. तथापि, याच काळात नदीमचे अटक वॉरंट मागे घेण्यात आले नाही. एकदा मुलाखतीच्या वेळी नदीम म्हणाले होते की, मला या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाल्याशिवाय मी मरणार नाही. मी निर्दोष होतो हे माझ्या पालकांना कळू द्या. मी न्यायाची वाट पहात आहे. भारत सरकारने मला न्याय द्यावा.