नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचा रणजीपटू , गेल्या काही हंगामापासून महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याने सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे टी-ट्वेंटी सामन्यांची स्पर्धा – सय्यद मुश्ताक अली चषक – आयोजित करण्यात येते. ११ ते २२ ऑक्टोबर मोहाली, चंदिगड येथे या स्पर्धेची पहिली फेरी पार पडली . महाराष्ट्राने सात पैकी चार सामने जिंकले. सत्यजितने ७ सामन्यात २६.२ षटकांत १६६ धावात , ६७ निर्धाव चेंडू टाकत एकूण १४ बळी घेतले. मेघालय विरुद्धची ४ षटकांत २० धावात ४ बळी हि या स्पर्धेतील सत्यजितची सर्वोत्तम कामगिरी झाली.
राष्ट्रीय पातळीवरील अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच गेल्या दोन हंगामापासून आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सत्यजितचा समावेश झाला होता. आय पी एल लिलावात, २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्या खेळाडुंच्या , आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात समाविष्ट होता. त्याबरोबरच आय पी एल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती . सत्यजितला चेन्नई सुपर किंग्स ने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.
Mushtak Ali T20 Trophy Satyajit Bacchav