.विशेष प्रतिनिधी, नाशिक :
श्रीकृष्ण म्हणजे बालगोपाळांचा लाडका कान्हा किंवा बालमुकुंद होय. कृष्णाची विविध रूपे आपण पाहतो, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जयंती तथा जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. नाशिकमधील विविध मंदिरात देखील जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा मागील वर्षीप्रमाणेच कोरोनाच्या संकटामुळे केवळ प्रातिनिधिक स्वरूपात हा जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे. जुन्या नाशिकमधील मुरलीधर मंदिरात यानिमित्त श्रीकृष्णाचे विविध रूपे आपल्याला दररोज बघायला मिळतात.
या उत्सवानिमित्त कृष्णाला विविध अलंकार आणि वस्त्रे परिधान करून सभोवताली सजावट करण्यात येते. जन्माष्टमी उत्सवात म्हणजे मंदिरात वेगळाच उत्साह असतो. शुकवारी गोपालकृष्ण राधेच्या रुपात सजले होते.सकाळपासूनच तयारी सुरु होती. दुपारी प्रत्यक्ष पोशाख करण्यास सुरुवात झाली. हळुहळु गोपालकृष्णाचे रुप राधेत बदलत गेले. त्यानंतर संध्याकाळी मंदिरात भजन रंगले.भजने म्हणणा-यांना देवाचा अवतार समजुन त्यांची पाद्यपूजा केली गेली. गळ्यात फुलांचे हार घातले. सुवासिनींना हळदी कुंकू लावुन त्यांचे पुजन केले. लहान लहान मुले राधाकृष्णाच्या वेशभुषेत इकडेतिकडे बागडत होती.
या संदर्भात अधिक माहिती देताना सुनील शिरवाडकर यांनी सांगितले की, खरंतर जन्माष्टमीचा हा उत्सव सुरु होतो पौर्णिमा झाल्यावर. पण त्याही आधी नागपंचमीला रात्री देवाला उत्सवाला येण्याचे आमंत्रण दिले जाते. गावातील काही भजनी मंडळे येतात. काही वंशपरंपरागत घराणी असतात, त्यांना मानाचा बुक्का देऊन उत्सवाला आमंत्रित केले जाते. पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष उत्सव सुरु होतो. त्यामुळे कधी झुल्यावर, तर कधी चंद्रावर मोठ्या दिमाखात गोपालकृष्ण आपल्याला दिसतो. तसेच श्रीकृष्ण नाग, मोर, गरुड ह्यावरही दिसतो. पण जन्माष्टमीला मात्र त्याचा परंपरागत पोशाख असतो. या मंदिरात दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताने दिलेला फुलांचा हार देवाला घातला जातो. रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा होतो. रात्रभर भजनी मंडळांचे कार्यक्रम सुरु असतात.
दुसऱ्या दिवशी नवमीला महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. तर दशमीला पालखी सोहळा असतो.खरंतर जन्माष्टमी झाल्यावर उत्सव संपला असे काही जणांना वाटते. पण त्यानंतरही चार दिवस मंदिरात कार्यक्रम सुरुच असतात. कारण एकादशीला गोपालकृष्ण गुराख्याच्या वेषात असतो. अंगावर घोंगडी, हातात काठी, आजुबाजुला गायी असे हे सुंदर रुप काही वेगळेच दिसते. द्वादशी म्हणजे देवाचा सन्मान केला जातो. त्या दिवशी देवाचा नैवद्याचा छान असा बेत असतो. द्वादशीला देवाचे बारसे होते. सकाळी रंगीबेरंगी फुलांनी पाळणा सजवला जातो.देवाचे नामकरण केले जाते. अगदी लहान मुलामुलींना पाळण्यात घालुन गोपालकृष्णाच्या विविध नावांनी संबोधले जाते. रात्री काल्याचे किर्तन होऊन उत्सवाची सांगता होते. यंदा मात्र प्रातिनिधिक स्वरूपात मुरलीधर मंदिरात हा उत्सव साजरा होत आहे असेही संयोजकांनी सांगितले.