विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये झालेल्या कुस्तीपटू सागर धनखड हत्येच्या तपासात मोठी बाब उघड झाली आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित असलेला ऑलिम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारने १९ दिवसांच्या काळात तब्बल ५ राज्यातील १९ ठिकाणे बदलली. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्याने सतत ठिकाणे बदलत होता. दिल्लीहून सुटल्यानंतर सुशीलकुमार थेट उत्तरप्रदेश मार्गे उत्तराखंडला गेला, तेथून तो हरियाणा, पंजाब, त्यानंतर पुन्हा हरियाणा आणि शेवटी दिल्लीला आल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमारने ओळखीतील व्यक्तींच्या मदतीने ठिकठिकाणी आश्रय घेतला. ऋषिकेशमधील हरिद्वार येथील आश्रमशाळेसह तीन ठिकाणी सुशीलकुमार थोडा वेळ थांबला. त्यानंतर दिल्लीतच त्याने चार वेळा आपले लपण्याचे ठिकाण बदलले. बहादूरगडमध्येही तो तीन वेगवेगळ्या ठिकाणी थांबला. यानंतर तो झज्जरमध्येही दोन ठिकाणी थांबला. त्यानंतर चंदीगडला गेला, तेथे त्याने दोन ठिकाणे बदलली. त्यानंतर पश्चिमी दिल्लीला तो पोहोचला. येथूनच पोलिसांनी त्याला अटक केली. अशाप्रकारे सुशील कुमारने दिल्लीपासून फरार झाल्यानंतर पुन्हा दिल्लीत येण्यापर्यंत १९ दिवसात ५ राज्यातील १९ ठिकाणे आश्रयासाठी वापरली.
पोलिसांनी सांगितले की, हत्याकांडाच्या त्या रात्री सुशील कुमारच्या साथीदारांनी स्टुडंट्स स्टेडियमवर हल्ला केल्यावर पळ काढला. पोलिस स्टेडियमवर येत असल्याचे समजताच सुशील कुमार साथीदारांसह फरार झाला. पण सुशीलचा एक साथीदार प्रिन्स पकडला गेला. पोलिसांनी त्याच्याकडील एक मोबाइल जप्त केला, ज्यात प्राणघातक हल्ल्याचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तपासासाठी एफएसएलकडे पाठविला गेला असता, तो व्हिडिओ खरा असल्याचे आढळले. तेव्हापासून सुशीलची चौकशी सुरू आहे. कारण या व्हिडिओमध्ये तो भांडण करताना दिसत आहे. या आरोपींना आणि हल्ल्यात सामील झालेल्या लोकांची पोलिस चौकशी करून त्यांच्या ठिकाणांवर छापा टाकत आहेत.