इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करणे ही आजच्या काळातील सर्वसामान्य गोष्ट असली तरी त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचते इतकेच नव्हे तर वाहतुकीला अडथळा ठरणे, भिंतीचे विद्रुपीकरण, कचऱ्यामध्ये वाढ, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील या जाहिरातबाजी मुळे घडतात. परंतु अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पोस्टर बॅनर लावण्याची प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद नागपूर या शहरात तर अशी पोस्टर आणि बॅनरबाजी नेहमीच सुरूच असते. मात्र मध्य प्रदेशातील इंदूर शहरात अशा पोस्टरबाजी आणि बॅनरबाजीला मुळीच थारा नाही. यामुळेच गेल्या काही वर्षांपासून इंदूर शहर स्वच्छता अभियानाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असते. हा सर्वांनी आदर्श घेण्यासारखा आहे. इंदूर शहरात पोस्टर लावणे आणि बॅनर लावणे या विरोधात तातडीने इंदूर महापालिकेच्यावतीने करत कारवाई करण्यात येते नुकतीच अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली. हा आदर्श अन्य शहरातील महापालिकांनी घेणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर महापालिका देशात पहिल्या क्रमांकावर आहे. या शहराकडून भारतातील अनेक शहरांनी आदर्श घेणे आवश्यक आहे. स्वच्छता ठेवण्यासाठी इंदूर महापालिका वेळेप्रसंगी कठोरही होत असल्याचे दिसून येत आहे. रंगरंगोटीच्या माध्यमातून सुशोभित केलेल्या भिंती, विजेचे खांब आणि इतर ठिकाणी बॅनर, पोस्टर आणि फ्लेक्स लावून महापालिकेने जाहिराती केल्याप्रकरणी इंदूर महापालिकेने 17 संस्थांना दंड केला आहे. त्यात कोचिंग क्लासेस, शाळा, टिफिन सेंटर, मार्केटिंग अधिकारी, फायनान्स आणि ब्रोकर कंपन्यांचे पोस्टर्स आणि बॅनर होते.
एमजीसीआय कोचिंग इन्स्टिट्यूटने गीता भवन, टिळक नगर, सिटी बसस्थानकावर बॅनर लाकून शहरातील स्वच्छतेला कलंकित करण्याबरोबरच विजेच्या खांबांवर बॅनर लावल्याप्रकरणी 50 हजार रुपयांचा स्पॉट दंड वसूल केला. याशिवाय छत्रीबाग येथील बीडी तोष्णीवाल शाळेवर 1 हजार रुपये, मानवी टिफिन सेंटरवर पाच हजार रुपये, इन्फोकॉम आणि ओयो रूम मार्केटिंग येथील 56 दुकानांवर 2 हजार रुपये, इंद्रप्रस्थ येथील केअर सर्व्हिस सेंटरवर 3 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. अशाप्रकारे महापालिकेने एकूण 17 संस्थांवर कारवाई करून 78,250 रुपयांचा स्पॉट दंड वसूल केला.