मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने आज विधिमंडळ अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली. सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक भरणा गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी 15 दिवसांत एसआयटी (विशेष चौकशी समिती) गठित करून चौकशी करण्यात येईल. या चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या अनियमिततेप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वीज देयके तयार करणाऱ्या महानगरपालिकेच्या तीन विभागातील जबाबदार एकूण ११ कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच २०१० पासून त्रयस्थ पद्धतीने याप्रकरणी सांगली महानगरपालिकेचे लेखा परीक्षण केले जाणार आहे.
विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. कोविड काळात तपासणी न करता वीज देयके देण्यात आली आहेत. या देयकांबाबत ही तपासणी करावी, अशी सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चर्चेदरम्यान केली.