मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची तडकाफडकी बदली केली आहे. ढोले यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी)ची नोटीस येताच ही बदली करण्यात आली आहे. युएलसी घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने समन्स बजावून ढोले यांना काही कागदपत्रे मागितली होती. त्यानंतर लगेच संध्याकाळी त्यांची बदली करून त्यांच्याजागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाईंदर येथील पाच जमिनींच्या विकासासाठी बनावट व खोट्या यूएलसी प्रमाणपत्राचा वापर करून इमारती बांधून विकण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तक्रार झाल्यावर २०१६ साली गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली होती. बनावट यूएलसी प्रमाणपत्राद्वारे अधिकारी, विकासक व मध्यस्थांमार्फत शासनाला १०२ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. काही काळानंतर या गुन्ह्याचा तपास थांबला होता.
दरम्यान, दिलीप ढोले यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या ना हरकत दाखल्यानंतर एका विकासकाला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली होती. समन्स बजावल्याने मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काटकर यांची दोन दिवसांपूर्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. कैलाश शिंदे यांच्या जागी नियुक्ती केली होती. आता डॉ. शिंदे यांना पुन्हा सिडकोत नियुक्त करण्यात आले आहे.
कुणाचा आशीर्वाद?
करोनाकाळात ढोले मीरा-भाईंदर महापालिकेत नियुक्त झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागील सरकारमध्ये रस्ते विकास महामंडळाचे मंत्रीपद असताना ढोले त्यांच्या खासगी सचिवांपैकी एक होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या मीरा-भाईंदरचे थेट आयुक्तपद त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
नवी जबाबदारी नाहीच?
दिलीप ढोले यांना अद्याप नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. २०२१ मध्ये दिलीप ढोले यांनी मीरा भाईंदर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. तीन महिने ते त्या पदावर होते. त्यानंतर ३ मार्च २०२१ रोजी त्यांना महापालिकेत आयुक्त म्हणून बढती करण्यात आली होती. तेव्हापासून ते कार्यरत होते. ढोले यांची बुधवारी चौकशी होऊ न शकल्याने, त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात येणार असल्याचे समजते.
ED notice comes, the officer will be transferred! Immediate appointment of another officer
Municipal Commissioner Immediate Transfer Government
Mira Bhayandar Mumbai ED Notice Sanjay Katkar IAS