लखनऊ (उत्तर प्रदेश) – तालिबान्यांची तुलना महर्षी वाल्मीकी ऋषींशी केल्याबद्दल शायर मुनव्वर राणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावणे, दोन समजात तेढ निर्माण करणे आणि अॅट्रोसिटीअंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
मुनव्वर राणा याने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तालिबान्यांची तुलना महर्षी वाल्मीकी यांच्याशी केली. मुनव्वर राणा याने दलित समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे, असा आक्षेप घेत डॉ. आंबेडकर महासभेने हजरतगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. डॉ. आंबेडकर महासभा ट्रस्टचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश अनुसूचित जाती आर्थिक आणि विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. लालजी प्रसाद निर्मल म्हणाले, की मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यामुळे दलित समाजात मोठा आक्रोश आहे. समाजातील लोकांमध्ये अपमान झाल्याची भावना आहे. अमरनाथ प्रजापती आणि पी. एल. भारती यांनी तक्रारीत म्हटले की, मुनव्वर राणा यांनी भगवान वाल्मीकी यांची तुनला तालिबान्यांशी करून देशातील कोट्यवधी दलितांचा अपमान केला आहे आणि हिंदूधर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
काय म्हणाला मुनव्वर राणा
न्यूज नेशन वृत्तवाहिनीशी बोलताना राणा म्हणाले, की भगवान वाल्मीकी यांनी रामायण लिहिले तर ते देव होतात. त्यापूर्वी ते डाकू होते. माणसाची भूमिका आणि व्यक्तिमत्व बदलत असते. आम्हाला आज अफगाणी लोक चांगले वाटतात. दहा वर्षांनंतर ते वाल्मीकी होतील. तुम्ही त्यांना देव म्हणत आहात. तुमच्या धर्मात कोणालाही देव संबोधले जाते. वाल्मीकी एक लेखक होते. त्यांनी त्यांची भूमिका निभावली आहे. रामायण लिहून त्यांनी मोठे काम केले आहे.
यूपीत हिंदू तालिबानी
यापूर्वी मुनव्वर राणा म्हणाले होते, की जितकी क्रूरता अफगाणिस्तानात आहे, तितकीच क्रूरता आपल्याकडे आहे. आधी रामराज्य होते, आता कामराज्य आहे. जितक्या एक-४७ तालिबान्यांकडे नसतील, तितक्या भारतात माफियांकडे आहेत. तालिबानी हत्यारे लुटून किंवा मागून आणतात, आपल्याकडे माफिया लोक खरेदी करतात. उत्तर प्रदेशातही काही तालिबानी आहेत. येथे मुस्लिमच नव्हे, तर हिंदू तालिबानीसुद्धा असतात.