मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोबर रोजी कारवाई केली.
यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 अशा एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 54 लाख 48 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालापैकी चेंबूर येथे 35 लाख 73 हजार 400 व मुंब्रा येथे 18 लाख 75 हजार 200 रूपयांचा समावेश आहे.
या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये 3 टेम्पो वाहने, 2232 किलो भांग मिश्रीत पदार्थ, परराज्यातील भारतीय बनावटीचे 120 बॉक्स विदेशी मद्य आदींचा समावेश आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. मुंब्रा येथील कारवाई ठाणे अधिक्षक प्रवीण तांबे, उपअधीक्षक श्री. वैद्य, श्री. पोकळे, ए. डी देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. चेंबूर येथील गुन्ह्यामध्ये दुय्यम निरीक्षक विशाल सकपाळ, रिंकेश दांगट, हनुमंत यादव, सहा. दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, जवान केतन वझे, भाऊसाहेब कराड, हनुमंत गाढवे, विजय पाटील, नारायण जानकर, श्रीराम राठोड, अमित सानप, कुणाल तडवी यांनी कारवाई केली. तसेच मुंब्रा येथील कारवाईमध्ये निरीक्षक एम.पी धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, दुय्यम निरीक्षक एस. आर मिसाळ,सहायक दुय्यम निरीक्षक बी. जी थोरात, जवान श्री. खेमनर, आर. एस पाटील, पी. ए. महाजन, पी. एस नागरे, एम. जी शेख, श्रीमती एस.एस. यादव यांनी सहभाग घेतला, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.