मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुक्या प्राण्यांना देखील प्रेम देण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. परंतु अलीकडच्या काळात पाळीव, रानटी प्राणी किंवा रस्त्यावर मोकाट फिरणारे श्वान व अन्य जनावरे यांचा छळ करण्याचा प्रकार वाढलेला दिसून येतो. वास्तविक पाहता प्राणी प्रेमी संघटनेकडून या संदर्भात वेळोवेळी मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने प्राण्यांना कोणताही त्रास देऊ नये, त्यांना इजा पोहचेल अथवा त्यांचा मृत्यू होईल, अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद केली आहे. तरी अशा घटना घडतच असतात. मुंबई शहरात देखील अशाच प्रकारची एक धक्कादायक व भयानक घटना घडली, एका महिलेने चक्क एका श्वानावर अॅसिड फेकले. या संदर्भातील घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
मुंबई व पुणे शहरात बेवारस किंवा मोकाट श्वान तथा कुत्र्यांना बेदम मारणे किंवा त्यांना उंच इमारतीवरून फेकून देण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत, अशाच प्रकारची ही घटना भयानक घटना मुंबई शहरात घडली आहे. गायकवाड नगरमधील स्वप्नपूर्ती इमारतीतील शबीस्ता सुहेल अन्सारी या महिलेने इमारतीतील श्वानावर अॅसिड फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचे हे कृत्य इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये महिलेविरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागण्याचे प्रतिबंध करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रागाच्या भरात कृत्य
खरे म्हणजे शबीस्ता सुहेल अन्सारी या महिलेने एक मांजर पाळले आहे. त्या मांजरीला घेऊन त्या फिरावयास जातात. त्याचवेळी ब्राऊनी नावाचा एक श्वान त्या मांजरी सोबत खेळत असतो, परंतु या महिलेला ही गोष्ट पटत नाही. कारण तिला वाटते की, हा श्वान आपल्या मनीमाऊला त्रास देतो. त्यामुळेच त्या महिलेला राग येत होता. यांच्या मांजराबरोबर हा श्वान इमारतीच्या गेटजवळ खेळत होता. मांजर आणि श्वान यांची मस्ती चालू असताना रागाच्या भरात तिने ब्राउनी या श्वानावर अॅसिड हल्ला केला. या अॅसिड हल्ल्यात श्वानाला गंभीर इजा झाली असून त्याच्या डोळ्याला देखील जखम झाली आहे. यामुळे श्वान प्रेमी बाळासाहेब भगत यांनी या महिलेविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. भगत यांच्या तक्रारीवरून शहिस्ता अन्सारी या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चौकशी करत आहेत.
Mumbai Women Throw Acid Dog Crime Police FIR
Malwani Cat Play