ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वसईतील धर्मांतराचे रॅकेट उघडकीस आल्यापासून सर्वसामान्य नागरिक सजग झाले आहेत. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून आपल्याला अडकविले जाऊ नये, याची काळजी घेत आहेत. त्यामुळे वसईतील एका कुटुंबात वडिलांचे धर्मांतर झाले असले तरीही मुलाचे धर्मांतर करण्याचा डाव फसला आहे.
मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी धागेदोरे जोडत चारशे लोकांच्या धर्मांतराचा मास्टरमाईंड शहनवाज याला अलिबागच्या एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आले. मुंबईच्या वरळीतून तो अलिबागला पळाल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. शहनवाज हा मोबाईल गेमिंग जिहादप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो हॉटेलमध्ये बसून बातम्या बघत होता, असे सिसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. १० जूनला रात्री तो भावासोबत हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे खोटी माहिती देऊन रुम करून राहात होता. पण वसईतील प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
इथे राहणाऱ्या राजेश जानी या व्यक्तीचे धर्मांतर झालेले होते. मात्र त्याचा १८ वर्षांचा मुलगा देवांग याचे धर्मातंर करण्याचा मोहसीन सोनी याचा डाव फसला आहे. कारण देवांग स्वतःच पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्याने तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आणखी किती लोक या प्रकरणात अडकले आहेत, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
दैवी शक्तीचा दावा
देवांग जानी याला दररोज फोन करून धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता. मोहसीन सोनी नावाची व्यक्ती त्याला फोन करून आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होती. इस्लाम स्वीकारल्यास तुझ्या आयुष्याचे कल्याण होईल, असे तो देवांगला सांगायचा. पण तरुण देवांगला आपण फसवले जात आहोत, याची जाणीव झाली आणि त्याने लगेच माणिकपूर पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर मोहसीनला मुंब्र्यातून अटक करण्यात आली.
राजेश नव्हे महमूद!
देवांगचे वडील राजेश जानी यांना आधीच धर्मांतराच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते. त्यासंदर्भात राजेश यांच्या कुटंबियांनीच तक्रार केली होती. राजेश यांचे नाव बदलून महमूद रियाझ करण्यात आले होते. त्यानंतर कुटुंबियांवरही दबाव आणला जात असल्याचे उघडकीस आले होते.