मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयुटीपी) हे मुंबई महागनर (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यासह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हे सर्व प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशित करुन एमएमआरडीएसह अन्य यंत्रणांच्या वित्तीय तसेच करार आदी बाबींवर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य सचिव तसेच अर्थ व नियोजन, वन विभागांचे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदी बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) प्रकल्पांबाबतची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे आज दुपारी घेतली. यावेळी ‘एमआरव्हीसी’च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई अर्बन वाहतूक प्रकल्पांचे सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केले.
मुंबई महानगर प्रदेश उत्तर आणि पूर्व दिशेला खास करून नवी मुंबईतील नव्या विमानतळाच्या दिशेला ज्या वेगाने विकसित होत आहे ते पाहता उपनगरीय वाहतूक व्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण आणि विस्तार आवश्यक झाला आहे.
या दृष्टीने ₹ 33,690 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आज मान्यता देण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या निधीतून ही रेल्वे विकास कामे होणार आहेत. यातली महत्वाची कामे अशी –
1) बोरिवली-विरार दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन – 26 RKM
2) कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन – 15 RKM
3) गोरेगाव-बोरिवली दरम्यानच्या हार्बर लाईनचा विस्तार – 7 RKM
4) कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी लाईन – 32 RKM
5) a) हार्बर लाईनवरील सीएसएमटी-पनवेल आणि ट्रान्स हार्बर लाईनवर सीबीटीसी
b) मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कल्याण मार्गावर सीबीटीसी
c) पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार मार्गावर सीबीटीसी
6) 19 रेल्वे स्थानकांची सुधारणा
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पुढील निर्देश दिले :
मुंबई महानगर प्रदेशातील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेचे नवे मार्ग, प्रलंबित मार्गांची कामे, नवी स्थानके, जुन्या स्थानकांचा विकास, भूसंपादन, पुनर्वसन या कामांसाठी निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा.
आवश्यक निधी उभारण्यासाठीचे पर्याय सादर करा.
प्रस्तावित रेल्वे विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी जबाबदारी निश्चित करा.
Mumbai Urban Transport Project Meeting