मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खाद्य पदार्थांमध्ये सर्रास भेसळ केली जात आहे. बाजारातील बहुतांश वस्तूंमध्ये भेसळ आढळून येते. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते, इतकेच नव्हे तर भेसळीचे काही कारखानेच मुंबईत असल्याचे उघड झाले आहे. ग्राहक आपल्याकडे आकर्षित व्हावेत, यासाठी कमी दरात आणि चकचकीत माल देण्याची स्पर्धा व्यापारी तसेच कारखानदारांमध्ये चाललेली दिसून येते. स्वस्त देण्याच्या आणि घेण्याच्या प्रकारात ग्राहक भरडला जातो. मसाल्याच्या पदार्थांमध्ये तर सर्रासपणे भेसळ दिसून येते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अशी होते भेसळ
सध्या जिऱ्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. दर वाढताच भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. जिऱ्यात तसाच दिसणारा सुवा नावाचा पदार्थ टाकला जातो. त्याचबरोबर जिऱ्याच्या झाडाच्या काड्या व गुळाचे पाणी आणि त्यावर जिरा पावडर चा स्प्रे मारला जातो. बडीशेपमध्ये जीरा पावडरचा स्प्रे मारला जातो. जिऱ्यामध्ये मिक्स करून हीच बडीशेप जीरा म्हणून विकली जाते. मसाल्याच्या मिरी या पदार्थात मिरीसारखे दिसणारे पपईचे बीज मिक्स करून भेसळ केली जाते. भारतातील ब्लॅकपरी, लालपरी लवंग अतिशय दर्जेदार असते. मात्र भारतात लवंगेमध्ये श्रीलंकेवरून येणारी कमी दर्जाची कोलंबो जातीची लवंग मिसळली जाते. दर वाढल्याने सर्रास भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याने ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे.
माहिती मिळताच छापा
हानिकारक कलर किंवा स्प्रे मारल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.मसाल्याचा पदार्थ आपण सर्वांच्याच घरी असतो. जवळपास प्रत्येक पदार्थात बनवताना आपण त्यात लवंग वापरतो. लवंगाचे जेवणात महत्व असून औषध म्हणून देखील गुणधर्म आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाने तुर्भे येथील एमआयडीसीत एका गोडाऊनवर छापेमारी करत सुमारे २ कोटी २५ लाखांच्या लवंग कांडीचा साठा जप्त केला आहे. एफडीए अधिकाऱ्यांनी मे.रिषी कोल्ड स्टोरेजवर छापेमारी करून ही कारवाई केली. या छापेमारी कारवाईत हलक्या दर्जाचे मसाले पावडर आणि लवंग पावडर तयार करण्यासाठी तसेच लवंगमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे.
कायदेशीर कारवाई
लवंग ही तिखट, कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळय़ांना हितकारक आहे. पाचक व रुची उत्पन्न करणारी प्रामुख्याने कफ विकारावर व काही प्रमाणात पित्त व कफ विकारावर काम करते. मात्र बनावट लवंगी कांडयाचा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ६० हजार किलो वजनाचा लवंग कांडीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या साठयातून ७ लवंग कांडीचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत.अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार या घटनेमुळे तुर्भे एमआयडीसी मध्ये उद्योजकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai Turbhe MIDC FDA Raid Clove Stock Seized