मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्योगपती अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी आज येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाल्या आहेत. काल फेमा प्रकरणात अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवण्यात आला. रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे परकीय चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाच्या चौकशीच्या संदर्भात सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी आज हजर झाल्या आहेत. त्यांची ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे.
रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी (वय ६४) हे बॅलार्ड इस्टेट भागातील फेडरल एजन्सीच्या कार्यालयात फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) च्या विविध कलमांतर्गत नोंदवलेल्या खटल्यात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी हजर झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनिल अंबानी २०२० च्या सुरुवातीला येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते.