ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘पार्टी विथ डिफरन्स’, अशी ओळख निर्माण करणाऱ्या भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये आपसात वाद दिसून येताहेत. सध्या केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद शिगेला पोहचला असून त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कथोरे आणि पाटील यांच्या वादाचे मुख्य कारण भाजपचे ग्रामीण भागाचे अध्यक्ष मधुकर मोहपे असल्याचे सांगण्यात येत आहे. भिवंडी लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणारे पाटील यांच्यासाठी पाच वर्षापुर्वी झालेली निवडणुक सोपी नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पाटील दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. २०१४ च्या तुलनेत मताधिक्य वाढले या खुशीत पाटील असले तरी हा विजय त्यांच्यासाठी वाटतो तितका सोपा नव्हता.
मोदी लाटेवर स्वार होत सलग दोन वेळा लोकसभेत पोहचलेल्या पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत मात्र विरोधकांपेक्षा घरच्या आघाडीवरच विरोधाचा सामना करावा लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे ग्रामीणचे भाजप अध्यक्ष मधुकर मोहपे यांच्या कार्यपद्धतीवरुन सध्या पाटील आणि कथोरे यांच्यात जाहीर वाद सुरु असून मोहपे यांना हटवा या मागणीसाठी कथोरे समर्थकांनी थेट प्रदेशाध्यक्षांचे दरवाजे थोटविल्याने ग्रामीणच्या गडातील विसंवादाचे हे वारे भाजपसाठी धोक्याची घंटा ठरु लागले आहेत.
पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी
राज्यात लोकसभेच्या अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी भाजपची बेरजेची गणिते विविध पातळ्यांवर सुरू आहेत. एकेकाळी कॅाग्रेसचा बालेकिल्ला असणारा या मतदारसंघातील काही विधानसभा क्षेत्रातही भाजपने बस्तान बसविले आहे. त्यामुळे प्रतिकूल वातावरणातही मोदी लाटेत कपील पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ बेरजेचा ठरु लागला आहे. असे असताना मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना सातत्याने नाराज करत पाटील यांनी येथे वजाबाकीचे राजकारण सुरु केल्याच्या तक्रारी कथोरे समर्थकांनी श्रेष्ठींकडे केल्या आहेत.
Mumbai thane BJP Politics Minister MLA Dispute
Kapil Patil Kisan Kathore Internal Argument