मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी फुगे तयार करणाऱ्या कंपनीने आज अशी काही झेप घेतली आहे की तिचा एक शेअर आज मार्केटमध्ये एका लाखाला आहे. हा इतिहास रचणाऱ्या कंपनीचे नाव आहे एमआरएफ टायर. एमआरएफचा शेअर आज १ लाखावर गेला असून हा टप्पा ओलांडणारा पहिलाच स्टॉक आहे, हे विशेष.
१९४६ मध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक वर्ष आधी फुगे बनविण्यापासून या कंपनीची सुरुवात झाली होती. १९६० मध्ये त्यांनी टायरच्या व्यवसायात प्रवेश केला आणि आज भारतातील सर्वांत मोठी टायर कंपनी म्हणून एमआरएफचा लौकीक आहे. एमआरएफ स्टॉकने मंगळवारी इतिहास रचला. हा एक लाख रुपयांचा आकडा गाठणारा भारतातील पहिला स्टॉक ठरला आहे.
बीएसईवर मंगळवारी हा शेअर ९९ हजार ५०० वर उघडला आणि सकाळच्या सत्रातील व्यवहारात १ लाख ३०० रुपयांच्या उच्चांकालाही स्पर्श केला. एमआरएफ शेअर १.३७ टक्क्यांनी वाढला आणि त्यामुळे त्याची किंमत एक लाख ३०० वर गेली. कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने टायर कंपन्यांच्या समभागात तेजी आली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एक हजारापासून सुरुवात
एमआरएफच्या शेअर्सची किंमत २३ वर्षांपूर्वी प्रति शेअर एक हजार रुपये होती. ११ वर्षांपूर्वी १० हजार रुपये, ८ वर्षांपूर्वी २५ हजार रुपये आणि ६ वर्षांपूर्वी ५० हजार रुपयांपर्यंत मजल मारली. चार वर्षांपूर्वी एमआरएफने ७५ हजार रुपयांपर्यंत मजल मारली होती आणि आज प्रति शेअर १ लाख रुपयांच्या पुढे पोहोचले आहे.
७५ देशांमध्ये निर्यात
भारतातील टायर उद्योगाची बाजारपेठ सुमारे साठ हजार कोटींची आहे. जेके टायर, सिएट टायर या कंपन्या एमआरएफ च्या स्पर्धक आहेत. एमआरएफचे भारतात अडिच हजारांहून अधिक वितरक आहेत. ही कंपनी जगातील 75 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते.
Mumbai Stock Exchange Share Price 1 Lakh Record