मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. विविध सांस्कृतिक पुरस्कारांच्या निवड समित्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध जीवन गौरव पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने, तर राज्य सांस्कृतिक कार्य पुरस्कारांच्या रकमेत तिपटीने वाढ करण्यात आली आहे.
बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, समिती सदस्य प्रशांत दामले, अशोक पत्की, पं. ब्रिजनारायण, भरत बलवल्ली, माधव खाडीलकर, अरविंद पिळगावकर, रघुवीर खेडकर, राजश्री शिर्के आदींसह पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, संगिताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, तसेच १२ वेगवेगळ्या कला प्रकारात देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीच्या बैठका झाल्या. बैठकीत पुरस्कारांसाठी प्राप्त शिफारशींमधून संभाव्य नावांवर चर्चा करण्यात आली.
जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देत सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांची रक्कम पाच लाख रुपयावरून दहा लाख रुपये तर राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २५ ते ५० वर्ष वयोगटातील कलावंतांना युवा पुरस्कार सुरू करण्याचे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.
निवड समिती सदस्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सत्यशील देशपांडे, उल्हास काशलकर, प्रभा अत्रे, डॉ. अजय पोहनकर, अश्विनी भिडे – देशपांडे, पं. उस्मान खान, प्रज्ञा देशपांडे, मंजुषा पाटील सुमीत राघवन, डॉ. मृदुला दाढे- जोशी, बाळू धुटे , सत्यपाल महाराज, विजयराज बोधनकर, जयराज साळगावकर आदी उपस्थित होते.
Doubling the amount of awards of the Department of Cultural Affairs
Mumbai State Government Awards Amount Double
Minister Sudhir Mungantiwar