विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाची चाचणी आता अवघ्या १०० रुपयांमध्ये होणार आहे. त्यासाठी मुंबईस्थित स्टार्टअपने याचे कीट विकसित केले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. कोविड १९ निदान तसेच संशय दूर करण्यासाठी किफायतशीर रॅपिड अँटिजेन चाचणीचे हे कीट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
हे किट पतंजली फार्मा या कंपनीने विकसित केले असून ते प्रमाणित RTPCR आणि रॅपिड अँटिजेन चाचणीला पूरक असेल आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व चाचणी किट पैकी सर्वात किफायतशीर दर असलेले असेल.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सुरु केलेल्या कोविड-१९ आजाराशी सुरु असलेल्या युद्धात सहाय्य करण्यासाठीचे केंद्र (कवच) नामक उपक्रमाच्या अंतर्गत जुलै २०२० मध्ये रॅपिड कोविड-19 निदान (कोविड-१९ संसर्गाचा संशय दूर करण्यासाठी आणि जलद निदानासाठी अनुक्रमे रॅपिड अँटिबॉडी आणि अँटिजेन) चाचणी किट विकसित करण्यासाठी पाठबळ दिले आहे.
पतंजली फार्मा कंपनीचे संचालक डॉ.विनय सैनी यांनी, आयआयटी मुंबई येथे या स्टार्ट-अपचे काम सुरु करून ८ ते ९ महिन्यात संशोधन आणि विकसन प्रयोगशाळेची उभारणी केली तसेच उत्पादनांची निर्मिती केली. ही उत्पादने तपासण्यासाठी आणि त्यांच्या दर्जात आणखी सुधारणा करण्यासाठी विविध कोविड केंद्रांवर पाठवून त्यांचे परीक्षण तसेच प्रमाणीकरण करण्यात आले आणि आवश्यक परवानग्या देण्यात आल्या.
“कोविड रुग्णांच्या नाकातील आणि घशातील स्त्रावांचे नमुने असलेल्या विषाणू वाहक माध्यमात आणि रुग्णांसाठी आमची उत्पादने वापरून प्रमाणीकरण करण्याचा अनुभव अत्यंत आश्चर्यकारक होता. माझ्या पथकातील सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मुंबईत विविध कोविड केंद्रांवर आम्ही विकसित केलेल्या उत्पादनांच्या अनेक मूल्यांकनाच्या वेळी मी उपस्थित राहिलो,” असे या उत्पादनांच्या विकासाच्या प्रवासाचे वर्णन करताना डॉ सैनी यांनी सांगितले.
जून २०२१ च्या सुरवातीला या रॅपिड कोविड-१९ अँटिजेन चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन स्टार्टअपने केले आहे. सुमारे १० ते १५ मिनिटांत होणारी ही चाचणी पॅथॉलॉजी तसेच चाचणी प्रयोगशाळांची कमतरता असलेला ग्रामीण भाग, डॉक्टरांचे दवाखाने तसेच मर्यादित साधने असलेल्या भागांमध्ये कोविड निदानासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही चाचणी किफायतशीर दारात होणार असून त्यामुळे महामारीला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.
सध्या ते DST SEED अनुदान आणि BRICS देश, CRISPR आधारित कोविड-१९ चाचणी अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या IUSSTF अंतर्गत कोविड-१९ प्रेरक अनुदान, भारत-अमेरिका प्रकल्प यांच्या माध्यमातून रॅपिड कोविड-१९ अँटिबॉडी चाचणी तसेच रॅपिड टीबी चाचणी यांच्यावर काम करीत आहेत.