मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक सुविधा देऊन जगातील अग्रेसर व सुलभ शहर बनवण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे उद्गार यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी काढले.
या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, कॅप्टन तमिल सेल्वन, प्रसाद लाड, महानगरपालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, माजी नगरसेविका श्रीमती राजेश्री राजेश शिरवडकर, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले की, विद्यमान राज्य शासनाने आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुंबई सुशोभीकरण, मंड्या आणि कोळीवाड्यांचा विकास यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईतील नागरिकांना तसेच जेष्ठांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यामुळेच मुंबईत स्वच्छता, सुशोभीकरण, आपला दवाखाना यासारख्या नावीण्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबईतील जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासाच्या सुविधेकरिता बेस्ट उपक्रमाकडून दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. न्यूयॉर्क येथील जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या ठिकाणी बसने नेऊन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जातो. याच धर्तीवर मुंबईतील जेष्ठ नागरिकांनाही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बेस्ट बसेस देण्यात येणार आहेत. मुंबईतील कोळीवाड्यात स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ‘फूड ऑन ट्रक’ ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने व्यवसायासाठी जागाही पुरवणार असल्याचे सांगून मंडयांमध्ये दर्जेदार सुविधेचा भाग म्हणून लोअर परळ येथे वातानुकुलित मंडई उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शीव (सायन) येथील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुल असा
मुंबई शहरात पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी शीव पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बांधावा, अशी एफ उत्तर विभागातील नागरिकांची सातत्याने मागणी होती. त्यानुसार शीव येथे हा पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलामुळे सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, धारावी, गांधी मार्केट या परिसरात ये जा करणार्या नागरिकांना फायदा होणार आहे. पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला दोन सरकते जिने, सामान्य जिने आहेत. एकूण ४४ मीटर लांबीचा तर ४.१५ मीटर रूंदीचा हा पूल आहे. दिवसापोटी किमान ७ हजार ते ८ हजार नागरिक या पुलाचा वापर करतील, असा अंदाज आहे. पूल बांधणीसाठी ५.६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
कोविड काळातील ताळेबंदी, सरकते जिने पुरवठादाराकडून झालेला विलंब, वृक्ष प्राधिकरण आणि वाहतूक विभागाची परवानगी अशा अनेक आव्हानांना सामोरे जात या पुलाचे काम ५२ महिने कालावधीत पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे गांधी मार्केटला जाण्यासाठीची सुविधा उपलब्ध होणार असून धारावीतून गांधी मार्केट आणि सायन कोळीवाडा येथे जाणाऱ्या नागरिकांना या पुलाचा फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पादचाऱयांना सुरक्षितता लाभून रस्त्यांवर होणारे अपघात टाळणेही शक्य होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक विनाअडथळा सुरू राहण्यासाठी देखील या पुलाची मदत होणार आहे.