शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई ते शिर्डी या दहाव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. या रेल्वेला साईभक्तांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे. मुंबई ते शिर्डी, शिर्डी ते मुंबई अशा दोन्ही फेऱ्यात १५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या २५ दिवसांच्या कालावधीत ३८ हजार ६६५ लोकांनी प्रवास केला. या माध्यमातून मध्य रेल्वेला ३ कोटी ४९ लाख ३६ हजार ३७७ रूपयांचा महसूल मिळाला आहे.
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ६.२० वाजता सीएसएमटीहून सुटते आणि साईनगर शिर्डी येथे ५ तास २० मिनिटांनी सकाळी ११.१० वाजता पोहोचते. सीएसएमटीहून सुटणारी ही गाडी दादर, ठाणे, नाशिक रोड स्थानकावर थांबते. तर साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस साईनगर शिर्डी येथून सायंकाळी ५.२५ वाजता सुटते आणि ५ तास २५ मिनिटांनी ती मुंबईत रात्री १०.५० वाजता पोहोचते. मंगळवारी मुंबई आणि शिर्डी येथून ही गाडी धावत नाही.
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी अनुक्रमे ९७५ रुपये आणि १८४० रुपये तिकीट दर आहे. या तिकिटामध्ये केटरिंगचा देखील समावेश आहे. प्रवाशांनी ऑन-बोर्ड केटरिंगची निवड न केल्यास चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसीटसाठी अनुक्रमे ८४० रुपये आणि १६७० रुपये तिकीट दर आहे.
साईनगर शिर्डी येथून साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे अनुक्रमे ११३० रुपये आणि चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी २०२० रुपये आहे. यामध्ये केटरिंग शुल्काचाही समावेश आहे. कॅटरिंगशिवाय चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचचे भाडे अनुक्रमे ८४० आणि १६७० रुपये आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये १५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते शिर्डी दरम्यान २१ प्रवासी फेऱ्यातून १९ हजार २६७ लोकांनी प्रवास केला. या माध्यमातून मध्य रेल्वेला १ कोटी ६६ लाख ५५ हजार ३२६ रुपये इतका महसूल मिळाला.
शिर्डी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान २१ प्रवासी फेऱ्यातून १९ हजार ३९८ लोकांनी प्रवास केला. या माध्यमातून मध्य रेल्वेला १ कोटी ८२ लाख ८१ हजार ५१ रुपये इतका महसूल मिळाला आहे. अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
Mumbai Shirdi Vande Bharat Express Passenger Response
Revenue Railway