मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय असो की परदेशातील शेअर बाजारांमध्ये चढ-उतार हे कायम सुरूच असतात. परंतु काही वेळा आपल्या देशातील शेअर बाजार इतका गडगडतो की, त्यामुळे मोठी खळबळ उडते. सध्या देखील असे चित्र दिसून येत आहे.
पाच दिवसांपासून शेअर बाजार घसरल्याने गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. जागतिक स्तरावर कमकुवत कल असताना सर्वांगीण विक्रीमुळे देशांतर्गत बाजारात घसरण सुरूच राहिली. बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स विक्रीच्या दबावामुळे 703.59 अंकांनी म्हणजेच 1.23 टक्क्यांनी घसरून 56,463.15 वर बंद झाला.
विशेष म्हणजे हे सलग पाचवे ट्रेडिंग सत्र आहे जेव्हा बाजार तळाला गेला आहे. एकूणच, पाच सत्रांत सेन्सेक्स 2,984.03 अंकांनी किंवा 5.01 टक्क्यांनी घसरला आहे. शेअर बाजारात पाच दिवसांच्या घसरणीसह BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 8,08,067.6 कोटी रुपयांनी घसरून 2,66,02,728.45 कोटी रुपये झाले.
दरम्यान, काहीशी तेजी दिसत असलेल्या शेअर बाजाराला पुन्हा उतरती कळा लागली आहे. सलग पाचव्या सत्रामध्ये शेअर बाजारात घसरण झाली असून आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 703 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 215 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,463 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,958 वर पोहोचला आहे.
16 मार्च 2022 नंतर पहिल्यांदाच निफ्टी हा 17 हजारांखाली आला आहे. त्याचप्रमाणे 1111 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2216 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 118 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. काल बाजार बंद होताना ऑईल अॅन्ड गॅस हे क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एका टक्क्याची घसरण झाली आहे. आयटी, उर्जा, रिअॅलिटी आणि FMCG या सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.
शेअर बाजारात झपाट्याने घट होण्याची प्रमुख तीन कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. त्यात प्रामुख्याने वाढत्या महागाईची चिंता, रशिया-युक्रेन युद्धामुळे आलेली अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री या तीन कारणांचा समावेश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मंगळवारी शेअर बाजारात HDFC, HDFC Life, SBI Life Insurance, HDFC Bank आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Apollo Hospitals, Coal India, Reliance Industries, ICICI Bank आणि BPCL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
त्याच वेळी सेन्सेक्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 3.42 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी व्यवहार बंद झाल्यानंतर सेन्सेक्सचे बाजार भांडवल 269.44 लाख कोटी रुपये झाले. मंगळवारी ते 266.02 लाख कोटी रुपयांवर आले आहे. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 9.14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.