मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेकांनी पोहण्याचे क्लास लावले होते. असे क्लास अनेक ठिकाणी अद्याप सुरू आहेत. पोहण्याचे शिक्षण घेताना देखील खूप काळजी घेणे गरजेचे असते. कारण पोहण्याच्या तलावात देखील दुर्घटना घडू शकते. मागील महिन्यात त्यामध्ये पुण्यात पोहताना एका तरूणाचा मृत्यू झाला होता, तर आता मुंबई देखील अशीच एक दुर्घटना घडली आहे. मात्र, या घटनेत शाळेच्या तरण तलावातच विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. दिंडोशी येथील एका शाळेच्या तरण तलावात १४ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हा मुलगा बुडाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोहण्याचे प्रशिक्षण
दिडोशी येथील शाळेत शार्दुल आरोलकर हा विद्यार्थी शिकत होता. तसेच तो बोरिवली पश्चिम येथील योगी नगरमधील शासकीय वसाहतीत कुटुंबियांसोबत राहत होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो शाळेतील तरण तलावात पोहण्यास शिकत होता. त्याचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाले होते. या तरण तलावात चार प्रशिक्षक होते. त्यातील मुख्य प्रशिक्षक सागर हा शार्दुलला पोहण्याचे प्रशिक्षण देत होता. दुपारच्या वेळी शार्दुल तरण तलावात बुडू लागला. सागरच्या ही बाब लक्षात येताच त्याने पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी शार्दुलच्या नाका तोंडात पाणी गेले होते, त्यानंतर त्याने उलटी केली व तो बेशुद्ध पडला.
प्रशिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी
शार्दुल हा बेशुद्ध पडल्याने त्याला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला प्रथमोपचार देऊन सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथेही त्याची प्रकृती गंभीरच होती, म्हणून त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी शार्दुलची तलासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शार्दुलचे वडील संजय आरोलकर यांनी याप्रकरणी दिंडोशी पोलिसांकडे तक्रार केली असून शाळा प्रशासन व प्रशिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मुलाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.