मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आज धक्कादायक प्रकार घडला. सांताक्रूझ येथील पोद्दार शाळेची बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस अचानक गायब झाली. स्कूल बस चालकाचा मोबाईल स्विच ऑफ येत होता आणि तब्बल ४ तास झाले तरी विद्यार्थी घरी आले नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण तयार झाले. शिवाय शाळेतही फोन खणखणू लागले. त्यामुळेच एकच मोठा गोंधळ उडाला. अखेर यासंदर्भात मुंबई पोलिसांकडेही तक्रारी आल्या. त्यानंतर पोलिसांनी बसची शोधाशोध सुरू केली.
दुपारी १२ वाजता शाळेतून निघालेली बस विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचली नाही. शाळेचा आज पहिलाच दिवस होता आणि त्यात विद्यार्थ्यांची बस गायब झाल्याने पालक, शाळा व्यवस्थापन हे सारेच हैराण झाले. बसमध्ये जवळपास २० मुले असल्याचे सांगितले जात होते. अखेर यासंदर्भात मुंबईचे सह पोलिसस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, बसचालक हा रस्ता चुकला. तो नवीन होता. त्याला रस्ता माहित नव्हता. त्यामुळे काही तासांनी विद्यार्थी त्यांच्या घरी पोहचले. बस व विद्यार्थी सुरक्षित आहेत. बस उशीरा पोहचल्याने शाळा व्यवस्थापनाकडून बससेवेचे कंत्राटदारावर कारवाई केली जाणार आहे. पुढील दोन दिवस या शाळेच्या बस बंद राहतील आणि चालकांना संपूर्ण माहिती दिली जाईल, असे नांगरे-पाटील म्हणाले.