मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मीरा रोड येथील सरस्वती वैद्य या आपल्या लिव्ह इन पार्टनरची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणारा मनोज साने सतत डेटिंग एपवर असायचा, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी यात पुढे येत आहे.
मनोज आणि सरस्वती यांनी काही वर्षांपूर्वी तुंगारेश्वर येथील मंदिरात जाऊन विवाह केला होता. त्यानंतर त्यांचे काही दिवस छान चालले, मात्र नंतर सतत वाद होऊ लागले. पण ही माहिती लोकांकडून पोलिसांना मिळाली होती. मनोज साने याने अद्याप याबद्दल स्वतःहून काहीच सांगितलेले नाही. परंतु, तपास करताना पोलिसांना साने हा डेटिंग एपवर सक्रिय होता, असे माहिती पडले. त्याचवेळी सरस्वतीचा मोबाईल तिच्याजवळ कमी आणि मनोजजवळच अधिक असायचा, हेही लक्षात आले आहे.
सरस्वतीचा मोबाईल पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात होता. शिवाय तो सुद्धा डेटिंग एपवर असायचा. त्यामुळे दोघांचा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता, हे स्पष्ट झाले. हाच वाद टोकाला गेला आणि त्यातच मनोजने सरस्वतीची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात मनोजच्या घरातून १३ प्रकारचे पुरावे जप्त केले आहेत. सरस्वतीचा खून करण्यापूर्वी तिच्यावर विषप्रयोग झाला असावा, अशी शंका पोलिसांना येत आहे. कारण काही दिवसांपासून मनोज गुगलवर यासंदर्भातील माहिती शोधत असल्याचेही पुढे आले आहे.
असे आहे प्रकरण
मीरा रोड येथील हे हत्याकांड अख्खा देश कधीही विसरू शकणार नाही. मनोज साने याने आपल्या ३२ वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिचे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे कुकरमध्ये शिजवून मिक्सरमधून बारीक केले. आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. ७ जूनला ही घटना घडली होती.
मोजक्या लोकांमध्ये अंत्यसंस्कार
सरस्वती वैद्य हिच्या मृतदेहाचे तुकडे जुळवून पोस्टमार्टमनंतर मृतदेह तिच्या बहिणींच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर रे रोड येथील स्मशानभूमीत सोमवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बहिणी, मोजके नातेवाईक आणि पंचांची उपस्थिती होती.