ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरातील आकाशदीप सोसायटीच्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्य यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मनोज सानेने सरस्वतीची क्रूर हत्या करून तिच्या मृतदेहाची इतक्या निर्दयतेने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची माहितीही समोर येत आहे. इतके नव्हे तर त्याच्या घरातून कीटकनाशके जप्त करण्यात आले आहे त्याने कीटकनाशक देऊन प्रेयसीला संपवले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात तिचा लिव्ह इन पार्टनर आणि कथित पती मनोज सानेला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहेत.
यातून पाजले कीटकनाशक
मनोज साने याच्यावर त्याची प्रेयसी तथा पत्नी सरस्वती वैद्य हिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे निर्घृणपणे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र, त्याआधी मनोज याने सरस्वती हिने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मात्र, काही दिवसांच्या चौकशीनंतर आता मनोज सानेने आपणच सरस्वतीला कीटकनाशक पाजून ठार मारले, अशी कबुली दिली आहे. मनोजने सरस्वती हिची हत्या करण्यापुर्वी त्याने १५ दिवसांपूर्वी दुकानातून कीटकनाशकाची बाटली विकत आणली होती. दुकानदाराने मनोज सानेची ओळख पटवली आहे.कारण किटकनाशक विकल्यानंतर त्याचे नाव, त्याचा बॅच नंबर या सगळ्याची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागते. सानेच्या घरी सापडलेले किटकनाशक आणि दुकानदाराच्या दुकानातली नोंद यावरचे तपशील सारखेच आहेत, हे किटकनाशक जप्त करण्यात आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले. तसेच हे कीटकनाशक ताकात मिसळून त्याने सरस्वतीला दिले. यानंतर मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले. या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले होते.
निलगिरी तेलाच्या बाटल्या
पत्नीची हत्या केल्यानंतर ७ जून रोजी सानेच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली होती. मनोजने मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी घरात रुम फ्रेशनर मारले होते. याशिवाय, मृतदेहाला निलगिरीचे तेल लावले होते. पोलिसांना मनोजनच्या फ्लॅटमध्ये निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या सापडल्या. मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर मनोजने तिच्या मृतदेहाला निलगिरीचं तेल लावलं होते, तसेच घरात मोठ्या प्रमाणावर रुम फ्रेशनरही मारले होते. मृतदेहाचा वास पसरु नये म्हणून त्याने हे कारनामे केले होते. पोलिसांनी निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या त्याच्या घरातून जप्त केल्या आहेत. तसेच मनोज सानेने ताक आणि निलगिरी तेलाच्या बाटल्या घेतल्या होत्या त्या दोन्ही दुकानादारांचे जबाबही नोंदवले आहेत.