पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आणि पुणे येथील नागरिकांवर एक एप्रिलपासून आर्थिक बोझा पडणार आहे. मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असलेल्या एक्स्प्रेसवेवरील टोल १ तारखेपासून महागणार असल्याने येथील नागरिकांची चिंता वाढली आहे.
मुंबई आणि पुणे येथील नागरिक दररोज या मार्गाचा वापर करतात. अगदी ठरवून वीकेंडला फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यासाठी याच मार्गाचा उपयोग करण्यात येतो. त्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांसाठी एक्स्प्रेसवे अत्यंत महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर होणारी टोलदरवाढ नागरिकांसाठी खर्चिक राहणार आहे.
१ एप्रिलपासून एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. २००४मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.
चर्चेत राहणारा मार्ग
पुणे, मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ कायम चर्चेचा विषय ठरतो.
असे असतील नवीन दर
वाहन-आत्ताचे दर-१ एप्रिलपासूनचे दर
चारचाकी-२७०-३२०
टेम्पो-४२०-४९५
ट्रक-५८०-६८५
बस-७९७-९४०
थ्री एक्सेल-१३८०-१६३०
एम एक्सेल-१८३५-२१६५
Mumbai Pune Expressway Toll Rates Hike