मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतुककोंडी लक्षात घेत या मार्गावरील दोन्ही बाजूची एक-एक लेन वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे हा मार्ग मोठा होणार असून त्याचा लाभ वाहनचालकांना होणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा खऱ्या अर्थाने या दोन्ही शहरांना जोडणारा दुवा बनला आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांतून दररोज तसेच शनिवार-रविवार या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे बरेचदा या मार्गावर जॅम लागतो. त्याचा फटका वाहनचालकांना बसतो. यापूर्वी तासनतास ताटकळत बसण्याची वेळ अनेकांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गाच्या दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हा मार्ग अधिक प्रशस्त होऊन वाहनांची ये-जा अधिक सुरळीतपणे होऊ शकणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तसा प्रस्ताव देखील तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच एक्सप्रेस वेवर दोन्ही बाजून अतिरिक्त लेन बांधण्यास सुरूवात होईल. या कामासाठी सुमारे ५ हजार कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज सुमारे ६० ते ७० हजार वाहनांची वाहतूक होते. शनिवारी व रविवारी या संख्येत वाढ होऊन ती ९० हजारांच्या घरात जाते. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या, अपघातांचे वाढते प्रमाण व निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरच्या प्रवासाला अडथळा येतो. त्यामुळे वाहनचालकासह प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक्सप्रेस वेवर दोन्ही बाजूने प्रत्येकी एक लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दशकांनंतर मुहूर्त
दोन नवीन लेन तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल. शिवाय प्रवासदेखील वेगवान होणार आहे. सद्यःस्थितीत या मार्गावर सहा लेन आहेत. यातील तीन लेन मुंबईच्या दिशेने, तर तीन पुण्याच्या दिशेने आहेत. येथील वाहतुककोंडी लक्षात घेता नवीन लेनची मागणी गेल्या दोन दशकांपासून सुरू होती. अखेर आता मुहूर्त लागला आहे.
mumbai pune expressway msrdc widening
one lane highway