मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ते अपघात ही आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे. नैसर्गिक आपत्तीतील मृत्यूंपेक्षा अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. शिवाय त्यात सातत्याने वाढ होत आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे नुकतेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर द्रुतगती महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा चर्चिला जात आहे. द्रुतगती महामार्गावरील आपघात रोखण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा नेमकी काय आहे, ती कशी काम करते, त्यामुळे अपघात रोखले जातील का, याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊया..
मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडण्यासाठी द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय १९९०मध्ये घेण्यात आला. हे काम प्रत्यक्षात १९९८ मध्ये सुरू करण्यात आले. ९४.५ किमीचा हा महमार्ग २००२मध्ये पूर्ण करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर अडीच ते तीन तासांत पूर्ण करणे शक्य होऊ लागले. या महामार्गावरुन दररोज ६० ते ८० हजार वाहने धावतात. अशा वेळी या वाहनांचे नियमन करण्याचे आव्हान महामार्ग पोलीस, एमएसआरडीसी आणि टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांसमोर आहे. महामार्गावरील वाहतुकीसाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. त्यानुसार या मार्गावर केवळ चारचाकी हलकी वाहने, जड, अवजड वाहने, बस आणि मालवाहू वाहने प्रवास करू शकतात.
या महामार्गावर घाटात वाहनांसाठी ताशी ५० किलोमीटर आणि अन्य ठिकाणी ताशी १०० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये आणखी पाच टक्के सवलत देण्यात आली आहे. चारचाकी तसेच अन्य वाहन चालविताना चालकांनी सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. तसेच अन्यही नियम आहेत. मात्र या नियमांचे पालन वाहनचालक काटेकोरपणे करत नाहीत. त्यामुळेच सातत्याने अपघात होतात. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात कडक कारवाई केली जाते, दंड वसुलीही केली जाते. मात्र त्यानंतरही नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८पासून जून २०२२पर्यंत ३३७ प्राणघातक अपघातांत ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. २०१८मध्ये १०० अपघातांत ११४ जणांचा, तर २०२१मध्ये ७१ अपघातांत ८८ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१मधील जानेवारी ते जून या कालावधीत ४१ अपघातांत ५० जणांना प्राण गमवावे लागले होते. आता जानेवारी ते जून २०२२ या काळात ३० अपघात झाले असून त्यात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी असलेली सध्याची यंत्रणा अपुरी पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने येथे अत्याधुनिक अशी आयटीएमएस (इंटेलिजंट मॅनेजमेंट ट्रॅफिक सिस्टीम) ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
द्रुतगती मार्गावर वाहतुकीची शिस्त पाळली जावी, अपघात टाळता यावेत या उद्देशाने वाहतूक नियमन करण्यासाठी, अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोचवण्यासाठी तसेच टोलवसुली जलद, अचूक तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशी ही यंत्रणा आहे. संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक १३० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून ३९ ठिकाणी वाहनांचा वेग तपासणारी ‘अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ लावण्यात येणार आहे. ठाण्यातील ‘मेसर्स प्रोटेक्ट सोल्युशन लिमिटेड’ या कंपनीला कंत्राट देण्यात आले असून आता अवघ्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
करारानुसार कामाच्या पूर्णत्वाचा कालावधी नऊ महिने असेल. काम पूर्ण झाल्यानंतर महिनाभर यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून वर्षभरात महामार्गावर आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन, बेकायदेशीर थांबा, विरुद्ध दिशेने वाहने नेणे, मार्गिकेच्या नियमांचे उल्लंघन, मोबाइल फोनचा वापर, सीट बेल्टचा वापर न करणे, फॅन्सी नंबर प्लेट, नियमापेक्षा अधिक मालाची वाहतूक, प्रतिबंधित क्षेत्रात दुचाकींचा प्रवेश आदी गुन्हे करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना या यंत्रणेच्या माध्यमातून दंड ठोठावला जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्नायझेशन यंत्रणा बसविली जाणार असून त्याद्वारे पथकर नाक्यावरच दंड वसूल केला जाणार आहे. एकूणच यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल आणि अपघात रोखले जातील असा दावा केला जात आहे. हा दावा किती खरा ठरतो आणि अपघात रोखले जातात का, हे वर्षभरानंतर म्हणजेच ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे दिसते.
Mumbai Pune Express Way ITMS System What Is It
Road Accident Traffic Violation
Intelligent Traffic Management System