मुंबई, पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबद्दल प्रेम व्यक्त करणे मुंबई, पुणे व आसपासच्या भागातील काही उपद्रवी लोकांना चांगलेच महागात पडले. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणे असो वा पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचे व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करणे असो, या दोन्ही प्रकारांची पोलिसांनी तातडीने दखल घेतली.
पुण्यातील कोंढवा परिसरात एका शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी दोन सुरक्षा रक्षक रात्रभर ड्युटीवर असतात. सोमवारी रात्री अर्थात १४ ऑगस्टला हे दोन्ही सुरक्षा रक्षक पाकिस्तान जिंदाबादचे नारे देताना काही लोकांना आढळले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये १४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा व्हिडियो इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड करण्यात आल्याचे उघडकीस आले. कुलाबा येथील दोन तरुणांनी हा व्हिडियो इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून शेअर केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनीच याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते. हे दोन्ही तरुण या प्रकाराच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यदिनी शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात होते, असे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतप पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्या कुटुंबियांनाही याची माहिती दिली. पोलिसांनी या दोघांचेही मोबाईल जप्त करून सत्यता पडताळून बघण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना मोबाईलमध्ये पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचे व्हिडियो इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचे दिसले.
समज देऊन सुटका
कुलाब्यातील या दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना बोलावले. दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. आणि पोलिसांनी कुटुंबियांपुढेच दोघांनाही समज दिली. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी केलेला प्रकार हा देशासाठी घातक आहे, याची जाणीव करून देत त्यांची सुटका करण्यात आली.
Mumbai Pune Crime Independence Day Pakistan Zindabad
Police Action FIR Arrest Booked Social Media