मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत उच्चस्तरीय मालमत्तांना अधिक मागणी असून जानेवारी ते मार्च २०२३ पर्यंत मुंबईत विक्री करण्यात आलेल्या २७ टक्के घरांच्या किमती १ कोटी रूपये व त्याहून अधिक किमतीच्या असल्याचे प्रॉपटायगरच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. मुंबईतील वैविध्यपूर्ण रिअल इस्टेट बाजारपेठेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान देशातील सर्वाधिक नवीन निवासी सदनिका लाँच दिसण्यात आले, जेथे सदनिकांची एकूण संख्या जवळपास दुप्पट होत ६०,००० युनिट्सपर्यंत पोहोचली.
नवीन सदनिका लाँचसंदर्भात अव्वल ३ बाजारपेठांमध्ये मुंबई शहर २०२३ च्या पहिल्या तिमाहीत अव्वलस्थानी होते, ज्यानंतर पुणे (३५,४८०) आणि हैदराबाद (१७,९३०) यांचा क्रमांक होता. मुंबईमध्ये नवीन पुरवठ्याचे बहुतांश प्रमाण डोंबिवली, भिवंडी व वसई या सूक्ष्म-बाजारपेठांत दिसून आले, ज्यामधून या भागांमध्ये संभाव्य वाढ दिसून येते.
२०२३ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान मुंबईमध्ये सरासरी किंमत १०,००० रूपये ते १०,२०० रूपये (प्रतिचौरस फूट रूपयांमध्ये) होती, ज्यामध्ये वार्षिक ३ टक्क्यांची वाढ निदर्शनास आली. ४० टक्के युनिट्सचे २५ ते ४५ लाख रूपयांच्या किमतीत लाँच आणि अतिरिक्त २३ टक्के युनिट्सची किंमत ४५ ते ७५ लाख रूपये किमतीच्या श्रेणीमध्ये असण्यासह गृहखरेदीदारांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ आणि प्रॉपटायगरडॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्हणाले, ‘‘मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेने २०२३च्या पहिल्या तिमाहीदरम्यान देशातील सर्वाधिक नवीन निवासी सदनिका लाँचसह प्रचंड वाढीसाठी स्थिरता व क्षमता दाखवली आहे. या उल्लेखनीय उपलब्धीमधून सकारात्मक बाजारपेठ भावना दिसून येते आणि शहराचे भारताची आर्थिक राजधानी म्हणून स्थान अधिक दृढ होते. घरांच्या पर्यायांसह किफायतशीर व मध्यम-विभागातील घरांच्या व्यापक श्रेणीसह शहर विविध किंमत श्रेणींमधील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. उच्चस्तरीय मालमत्तांसाठी प्रबळ मागणीमधून मुंबईतील उच्चभ्रूंची पसंती दिसून येते. आम्हाला मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी आशादायी भविष्याची अपेक्षा आहे, ज्याचे श्रेय पायाभूत सुविधा विकास, सरकारी उपक्रम आणि जागतिक आर्थिक हब म्हणून शहराच्या स्थानाला जाते.’’
नवीन पुरवठ्यामध्ये वाढ होण्याव्यतिरिक्त मुंबईमध्ये २०२३ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान विक्रीत ३९ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. गृहखरेदीदारांनी ३२,३८० सदनिकांची खरेदी केली, ज्यामधून २०२२ मधील याच कालावधीच्या तुलनेत सकारात्मक ट्रेण्ड दिसून आला. पण, २०२३ च्या पहिल्या तिमाहीत विक्रीमध्ये तिमाही-ते-तिमाही फक्त ३ टक्क्यांची किरकोळ वाढ दिसण्यात आली.
मुंबईचे राष्ट्रीय विक्री आकडेवारीमधील प्रभुत्व कायम आहे, जेथे विक्रीचा ३८ टक्क्यांचा सर्वोच्च हिस्सा होता. उल्लेखनीय बाब म्हणजे डोंबिवली, ठाणे पश्चिम व पनवेल २०२३ च्या पहिल्या तिमाहीत गृहखरेदीदारांसाठी सर्वात पसंतीचे स्थान म्हणून उदयास आले, ज्यामधून रिअल इस्टेट बाजारपेठेतील त्यांची आकर्षकता दिसून येते.
या अहवालामधून निदर्शनास येते की, २०२३ च्या पहिल्या तिमाहीमध्ये विक्री करण्यात आलेल्या ५४ टक्के सदनिका १ बीएचके कन्फिग्युरेशन्सच्या होत्या, ज्यानंतर २ बीएचके सदनिकांचा ३५ टक्के हिस्सा होता. तसेच १ कोटी रूपयांहून अधिक किमतीच्या श्रेणीमध्ये २७ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली.