मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते शैलेश पांडे तसेच मीरा भाईंदरच्या उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका स्नेहा पांडे, काँग्रेसच्या माजी नगरसेविका सारा अक्रम यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील , माजी आमदार नरेंद्र मेहता , अमरजीत मिश्रा आदी उपस्थित होते. श्री . शैलेश पांडे यांची भाजपाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारताला आत्मनिर्भर, सर्वश्रेष्ठ देश बनविण्याची संकल्पना मांडली आहे. पंतप्रधानांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. घर चलो अभियानाद्वारे ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधण्याचा पक्षाचा संकल्प आहे. पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उद्धव ठाकरे गटाचे सुरेश दुबे, विनोद तिवारी, संदीप शर्मा, संजय गुप्ता, विनायक पांडे, भोलानाथ गुप्ता, विनोद मिश्रा, अभिषेक दुबे आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
Mumbai Politics BJP Uddhav Thackeray Group Leaders