मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कडवे शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांचा संशयास्पद मृत्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांच्या मृत्यूसंदर्भात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रत्युतर दिले आहे. त्यामुळे आता आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने राजकीय क्षेत्रात नव्याने शाब्दीक युद्ध पाहायला मिळत आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे कार्यकर्ते असलेल्या आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना वाढविली. मुंबईलगतच्या आदिवासी भागात त्यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. अल्पावधीतच ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. एका क्षणाला त्यांचे पक्षातील वर्चस्व प्रचंड वाढले होते. त्याचदरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद असून ती हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
यापूर्वी आनंद दिघे यांची हत्या झाल्याच्या दाव्यावरून बरेण रणकंदन माजले आहे. या पार्श्वभूमीवर आता आमदार संजय शिरसाट यांनी नव्याने दिघेंच्या मृत्यूचा विषय उकरून काढला आहे. ‘आनंद दिघेंचा अपघात नव्हे खून झाल्याचा संशय आहे,’ असे वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. शिरसाट यांना उत्तर देत केदार दिघे यांनी, ‘तुमच्याकडे पुरावे असतील तर सादर करा, आनंद दिघे यांचा पुतण्या या नात्याने मी त्यामागे ठामपणे उभा राहीन’, असे म्हटले आहे.
टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न
मला अत्यंत दुःखं वाटतं की दिघे साहेबांच्या पश्चात गेल्या २२ वर्षांत त्यांच्या मृत्यूचा विषय कधी कोणी काढला नाही. कधीही कोणी याबाबतीत बोललं नाही. अचानक निवडणुका येतात किंवा स्वतःचे अस्तित्व दाखवायचे असते तेव्हा दिघे साहेबांचा विषय काढला जातो. बोलायचे म्हणून बोलायचं आणि दिघे साहेबांच्या नावाने स्वतःला टीआरपी मिळवून घ्यायचा, हा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून झालेला दिसतो अशी टीका केदार दिघे यांनी शिरसाट आणि पर्यायाने शिंदे गटावर केली आहे.
Mumbai Politics Anand Dighe Death Sanjay Shirsat Kedar Dighe