मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपण एखाद्या कामासाठी कॉल सेंटरच्या नंबरवर फोन करतो आणि पलीकडनं येणारा गोड आवाज आपली फसवणूक करतो, असा अनुभव रोज लाखो भारतीयांना येतो. पण भारतात बसून ऑस्ट्रेलियातील लोकांची फसवणूक करणारे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबईच्या बाहेरील राजोरी बीचच्या ठिकाणी एका बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे याठिकाणी ज्या गोष्टी सापडल्या आहेत, त्यावरून या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शंका व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश नाश्त्याच्या अॉर्डरवरून पोलिसांना करता आला. बीचच्या जवळील एका इमारतीत कॉल सेंटर होते.
येथील कर्मचाऱ्यांना बाहेर जायची किंवा बाहेरच्या लोकांसोबत बोलण्याची परवानगी नव्हती. पण त्यांच्यासाठी रोज पहाटे चार वाजता जवळच्या एका हॉटेलमधून नाश्त्याची अॉर्डर दिली जायची. अर्थात त्यात गैर काहीच नव्हते. पण रोजच पहाटे चारला अॉर्डर यायला लागल्यामुळे पोलिसांना शंका यायला लागली. त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली.
केवळ एवढ्या कारणावरून कारवाई शक्य नव्हती. त्यामुळे पोलिसांनी पूर्णवेळ लक्ष ठेवले आणि त्यातच त्यांना आत काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकली तर बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचे निदर्शनास आले. जवळपास ४७ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
थेट ऑस्ट्रेलियात कनेक्शन
या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना ऑस्ट्रेलियातील बँक ग्राहकांचे कॉल रिसिव्ह करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतून थेट ऑस्ट्रेलियातील नागरिकांची फसवणुक सुरू असावी, असा अंदाज बांधण्यात आला आहे. याठिकाणाहून लॅपटॉप व इतर वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अनेकांची खासगी माहिती आणि ओटीपी देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने मुंबईत इतर ठिकाणी अश्याप्रकारचे अवैध काम कुठे सुरू आहे का, हे तपासले जात आहे.
Mumbai Police Burst Bogus Call Centre