मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भटक्या कुत्र्यांचा त्रास सर्वश्रुत आहे. त्यांचा त्रास नको म्हणून त्यांना पकडून नेण्याची मागणी नागरिक वारंवार करत असतात. एवढेच नव्हे तर कोणाच्या घरी पाळीव कुत्रा असेल तर त्याचाही आसपासच्या लोकांना त्रास होतो आणि ज्याच्याकडे पाळीव प्राणी आहे, त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या जातात. नेमका असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. एक तरुणी परिसरातील मांजरीला खायला घालत असल्याने तिला शेजाऱ्यांनी चक्क मारहाण केली. ती सुद्धा एवढी की तिच्या हाताला ३२ टाके पडले आहेत. सिमरीन शुक्ला असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी सिमरीनच्या वतीने पोलिसांत राजकुमार मिश्रा आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तर मिश्रांनी तरुणीविरोधात तक्रार केली आहे.
काय आहे घटना?
मुंबईतील भुलेश्वर येथे ही घटना घडली. परिसरातील मांजरांना सिमरीन नेहमी खायला देत असे. त्या मांजरी आपल्या घरासमोर घाण करत असल्याची मिश्रा कुटुबियांची तक्रार होती. याबाबत सिमरीन आणि मिश्रा कुटुंबियांमध्ये यापूर्वीही खटके उडाले होती. मात्र त्यानंतरही सिमरीनने खाणे देणे न थांबवल्याने मिश्रा कुटुंबीयांनी टोक गाठत सिमरीनला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर सिमरीनच्या हातातून आणि पायातून रक्तस्त्रावही झाला. तिच्या हाताला ३२ टाके पडले आहेत.
जस्ट स्माइल चॅरिटेबल ट्रस्टच्या स्नेहा विसारिया यांच्या मदतीन तिने तक्रार दाखल केली आहे. तर यानंतर मिश्रा कुटुंबियांनी देखील त्यांच्यावर हल्ला केल्याची काउंटर तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी सिमरीनच्या १४ वर्षांच्या भावावरही मांजरांना खायला दिल्याने त्याच शेजाऱ्यांनी मारहाण केली होती, असं विसारिया म्हणाले. पोलिसांनी याबाबत म्हटलं की, दोन्हीकडून काउंटर तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत. गुन्हा गंभीर नसल्याने कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.