मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणा-या आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे हा आरोपी हा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून त्याने गु्न्हा केल्याचे कबूल गेले आहे.
स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानंतर बुधवारी सकाळी ही गोष्ट शिवसैनिकांच्या निदर्शनास येताच एकच गर्दी झाली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली.
आरोपीचा धक्कादायक खुलासा
आरोपीला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने धक्कादायक माहिती दिली आहे. संपत्तीच्या वादात उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आरोपी सातत्याने यायचा अशी माहिती समोर आली आहे.