मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई विमानतळ आयुक्तालय, विभाग-III च्या अधिकाऱ्यांनी, २.२१ कोटी रुपये किमतीचे २.८३० किलो वजनाचे सोने जप्त केले. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आले आहे.
सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुबईहून मुंबईला येणारे ३ प्रवासी आणि याच विमानतळाच्या डिपार्चर हॉल येथे काम करणाऱ्या एका खाजगी विमानतळ कर्मचाऱ्याला रोखले आणि त्यांच्याकडून वॅक्स मध्ये मिसळलेली २४ कॅरेट शुद्धतेची गोल्ड डस्ट जप्त केली. या सोन्याचे एकूण वजन २.९६६ किलो तर निव्वळ वजन २.८३० किलो आहे आणि त्याचे अंदाजे मूल्य २.२१ कोटी रुपये आहे.
या प्रवाशांनी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये हे सोने लपवल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. हे सोने नंतर दुकानात लटकवलेल्या ब्रँडेड ज्यूट बॅगमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर, तीच बॅग त्या दुकानात काम करणाऱ्या खाजगी विमानतळ कर्मचाऱ्यांनी उचलली होती. सीमाशुल्क कायदा,१९६२ अंतर्गत ४ जणांना अटक करण्यात आली.