मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विमानतळ आयुक्तालय, मुंबई, विभाग -3 च्या अधिकाऱ्यांनी १९ ते २१ जानेवारी या कालावधीत वेगवेगळ्या ४ प्रकरणांमध्ये १,५९६ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. या सोन्याचे अंदाजे मूल्य १.१६ कोटी रूपये आहे. याशिवाय विदेशी चलने आणि नैसर्गिक तसेच प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे जप्त केले. त्यांचे एकूण मूल्य १.३६ कोटी रूपये आहे.
पहिल्या प्रकरणात, १९ जानेवारी रोजी, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ‘स्पॉट प्रोफाइलिंग’ च्या आधारे ५ जानेवारी रोजी शारजाहहून आलेल्या एका प्रवाशाला रोखले आणि २४ केटी कच्चे गोल्ड डस्ट जप्त केली. या सोन्याचे एकूण निव्वळ वजन ७२५ ग्रॅम आहे. या सोन्याचे अंतरिम मूल्य ५२.७४ लाख रूपये आहे. तसेच अधिकारी वर्गाने ४५६.१२ ग्रॅम वजनाचे वितळवलेले सोन्याचे तुकडे जप्त केले.ज्याचे अंतरिम मूल्य ३३.१७ लाख रूपये आहे. हे सोने प्रवाशाने परिधान केलेल्या डेनिमच्या खास तयार केलेल्या पाउचमध्ये, शरीराच्या पोकळीत, कागद आणि कापडाला चिकटवून,अत्यंत शिताफीने लपवले होते. प्रवाशाकडून एकूण १, १८१ ग्रॅम सोने जप्त केले.त्याचे अंतरिम मूल्य ८५.११ लाख रूपये इतके झाले. अवैध सोने आणणाऱ्या प्रवाशाला सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली.
यानंतर २० जानेवारी रोजी, बहरीनहून आलेल्या आणखी एका प्रवाशाला अटक करण्यात आली, ही अटक देखील ‘स्पॉट प्रोफाइलिंग’ च्या आधारे केली. एक्स-रे तपासणी दरम्यान आढळून आले की, प्रवाशाने ४१५ ग्रॅम वजनाचे वितळवलेले सोने खाल्ले होते ज्याची अंतरिम किंमत ३१.०८ लाख रूपये इतकी होती.
यानंतर २१ जानेवारी रोजी तिसऱ्या प्रकरणात, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मस्कतला जाणाऱ्या दोन प्रवाशांना रोखले. अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून युरो 4500 युरो , 39000 सौदी रियाल , 2340 ओमानी रियाल, असा विदेशी चलनांचा साठा जप्त केला. आणखी दुसऱ्या एका प्रवाशाकडून 59500 सौदी रियाल आणि 446.62 कॅरेटचे नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे जप्त केले. त्यांची एकूण किंमत 1.05 कोटी रूपये आहे. या प्रवाशांनी आपल्या सामानात परकीय चलन लपविले होते. तर एका प्रवाशाने शरीराच्या पोकळीत हिरे लपविले होते. या प्रकरणी सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत एका प्रवाशाला अटक करण्यात आली.